मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिच्याबरोबर ऋषी सक्सेनाही मुख्य भूमिकेत होता. सायली व ऋषीच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. आता तब्बल सात वर्षांनी सायली व ऋषीची जोडी पुन्हा एकत्र आली आहे. नुकतीच सायलीने सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा-
झी मराठी वाहिनीवर २८ मार्च २०१६ रोजी ‘काहे दिया परदेस’ मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला. या मालिकेत सायली संजीवने मराठी मुलगी गौरी व ऋषी सक्सेनाने उत्तर भारतीय तरुण शिव हे पात्र साकारले होते. या मालिकेत शिव व गौरीची प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती. प्रेक्षकांकडून या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. तब्बल दीड वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर २३ सप्टेंबर २०१७ ला ही मालिका बंद झाली. मात्र, अजूनही प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबाबतचे प्रेम तसेच आहे.
‘काहे दिया परदेस’ मालिका संपून तब्बल सात वर्षे झाली आहेत. इतक्या वर्षांनंतर आता पुन्हा प्रेक्षकांची ही लाडकी जोडी एकत्र आली आहे. सायली व ऋषी ‘समसारा’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. सायलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबतच्या एक पोस्टमध्ये सायलीने ऋषी सक्सेनाबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो शेअर करीत तिने ‘७ वर्षांनंतर सोबत शूट’ अशी कॅप्शन दिली आहे.
‘संचय प्रॉडक्शन्स’च्या पुष्कर योगेश गुप्ता यांनी ‘समसारा’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. सागर लढे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. गर्भवती भानवीच्या दैवी जुळ्या मुलांना नष्ट करण्याची इच्छा असलेला एक असुर तिच्यासमोर येतो आणि देव, असुर यांच्यात युद्ध सुरू होते. त्यामुळे मृत्यूचा देव यम आणि जीवनाची देवी यमी यांची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सायली व ऋषीव्यतिरिक्त या चित्रपटात पुष्कर श्रोत्री, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.