झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ (Kahe Diya Pardes) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या मालिकेची कथा, कलाकार व सुस्वर शीर्षक गीत आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेत अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि अभिनेता ऋषी सक्सेना ही नवी जोडी पाहायला मिळाली होती. मार्च २०१६ मध्ये आलेल्या या मालिकेच्या आठवणीत प्रेक्षक आजही रमतात. या मालिकेतली सायलीची गौरी ही भूमिकाही प्रेक्षकांना भावली होती. त्यानंतर सायली संजीव आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
अभिनेत्री ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील एका मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सायलीने ती लवकरच मालिकेत काम करणार असल्याचं सांगितलं होतं. अशातच यंदाच्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांना सायलीची झलक पाहायला मिळाली. दरवर्षी या पुरस्कार सोहळ्यात नवीन मालिकांची घोषणा केली जाते. यादरम्यान नवीन मालिकांमध्ये झळकणारे कलाकार एकत्र परफॉर्मन्स सादर करतात.
अशातच यंदाच्या स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात सायलीबरोबर ‘ठिपक्यांची रांगोळी’फेम अभिनेता चेतन वडनेरे पाहायला मिळाला. दोघांनी एकत्र डान्स परफॉर्मन्सही केला होता. त्यामुळे सायली-चेतन या दोघांची एक नवीन मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येणार आहे हे स्पष्ट झालं आहे. अशातच दोघांनी एकमेकांच्या कामाचं कौतुक केलं आहे. ‘राजश्री मराठी’शी साधलेल्या संवादात दोघांनी एकमेकांच्या जुन्या कामाचं कौतुक केलं आहे.
यावेळी सायली असं म्हणाली, “मला चेतनचं ‘ठिपक्यांची रांगोळी’तलं काम आवडायचं. मी आईबरोबर ही मालिका बघायची. त्यामुळे चेतन हा खूप उस्फूर्तपणे काम करणारा अभिनेता आहे, असं मला वाटतं. जेव्हा आमची लूक टेस्ट झाली, तेव्हा त्याने केलेल्या उस्फूर्त कामाबद्दलही मी त्याचं कौतुक करीन. कारण- मला अपेक्षितच नव्हतं त्याचं काम. तो असं काहीतरी काम करेल हे मला अजिबातच वाटलं नव्हतं. तेव्हा माझी अगदी सहज प्रतिक्रिया आली होती. त्या प्रतिक्रिया ठरवलेल्या नव्हत्या. त्यामुळे मला तेव्हाच असं वाटलं होतं की, याच्याबरोबर खूप मस्त काम करता येणार आहे”.
त्यानंतर चेतनने सायलीच्या कामाचं कौतुक करीत म्हटलं, “सायलीचं ‘काहे दिया परदेस’मधील काम सगळ्यांनीच पाहिलं आहे. ते मीही बघितलं होतं आणि त्यात तिनं खूपच छान अभिनय केला होता. त्याशिवायही तिची बरीच कामं आहेत. नुकताच मी तिचा ‘झिम्मा’ चित्रपट पाहिला. ‘झिम्मा’मधलं तिचं काम आणि तिची भूमिका फारच कमाल होती. त्यामुळे तिच्याकडे कामाची खूप विविधता आहे आणि याचा मला अंदाज आहे”.