अभिनेता शुभंकर एकबोटे व अभिनेत्री अमृता बने टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी आहे. ‘कन्यादान’ मालिकेतून दोघे घराघरांत पोहचले. आता ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आता ते लवकरच लग्न करणार आहेत. सध्या त्यांच्या केळवणाचे कार्यक्रमही पार पडत आहेत. नुकतेच अमृता कुटुंबीयांनी अमृता व शुभंकरच्या केळवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
अमृताने केळवणाचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अमृताने व्हिडीओ पोस्ट करत लिहिले, “तुम्ही आनंदाचा गुणाकार अनुभवला आहे का? मला वाटते की मी त्यातून जात आहे.” अमृताची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत दोघांचे अभिनंदन केले आहे.
‘कन्यादान’ मालिकेत अमृता बनेने वृंदा आणि शुभंकर एकबोटेने राणा हे पात्र साकारले आहे. या मालिकेच्या सेटवरच अमृता आणि शुभंकर यांची पहिल्यांदा भेट झाली. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आता त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘कन्यादान’ मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कमी कालावधीतच ही मालिका लोकप्रिय बनली. या मालिकेत अमृता बने व शुभंकर एकबोटे व्यतिरिक्त अभिनेते अविनाश नारकर मुख्य भूमिकेत असून उमा सरदेशमुख, संग्राम साळवी, अनिशा सबनीस, प्रज्ञा चवंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.