Marathi Actor Kapil Honrao : अलीकडच्या काळात सगळेच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपलं व्यावसायिक आयुष्य असो किंवा वैयक्तिक सगळेजण आपल्या चाहत्यांना इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत माहिती देत असतात. अनेकदा या कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. असाच काहीसा अनुभव ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत झळकलेल्या कपिल होनरावला आला.
कपिस होनरावने ( kapil honrao ) नुकतेच त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘करवा चौथ’ सणाचे फोटो शेअर केले होते. या फोटोंवर काही नेटकऱ्यांनी मराठी संस्कृतीशी निगडीत कमेंट्स करत त्याला ट्रोल केलं होतं. या नकारात्मक कमेंट्स पाहून अभिनेता चांगलाच संतापला. यावर आधारित पोस्ट शेअर करत कपिलने त्याच्या ट्रोलर्सना स्पष्ट उत्तर देत हा सण साजरा करण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. अभिनेता मराठी असला तरी त्याची पत्नी मूळची महाराष्ट्रातली नाही. ती हिंदी भाषिक असल्याने कपिल हा सण साजरा करतो असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कपिल होनरावची पोस्ट
“आजकाल लोकांना काय झालंय…तुम्ही मराठी कलाकार असे झालात तसे झालात अशा कमेंट करतात. हे मराठीमध्ये करत नाही ते करत नाही…अशा कमेंट्स करण्याआधी सत्य परिस्थिती जाणून घ्या. वीट आलाय यार या लोकांचा… माझी बायको नॉर्थ साइडची आहे. हिंदी भाषिक आहे. करवा चौथ हा तिचा सण आहे. जशी ती माझ्याबरोबर सगळे मराठी सण साजरे करते, अगदी तशाचप्रकारे मी सुद्धा हा सण तिच्यासाठी साजरा करतो. माझी महान मराठी परंपरा, मराठी संस्कृती हे नाही करायचं असं कधीच बोलू शकत नाही. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यावर कमेंट करताना जरातरी विचार करा.” अशी पोस्ट शेअर करत कपिलने ट्रोलर्सना सुनावलं आहे.
दरम्यान, अभिनेता कपिल होनराव ( Kapil Honrao ) गेली अनेक वर्षे मराठी नाटक, मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत त्याने मल्हार हे पात्र साकारलं होतं. त्याने साकारलेल्या पात्राला चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता येत्या काळात प्रेक्षक कपिलला आणखी नवनवीन भूमिकांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.