‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना नवी ओळख मिळवून दिली. या कार्यक्रमातील हलके-फुलके विनोद प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू आणत असतात. आजही या कार्यक्रमाचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. तर आता या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून सहभागी होण्याबद्दल कपिल शर्माने एक मोठा खुलासा केला आहे.
‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाबद्दल विविध बातम्या समोर येत असतात. टीव्हीवर हा कार्यक्रम प्रेक्षक आनंदाने बघतातच पण त्याचबरोबर हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्यासाठी देखील बरेच प्रेक्षक प्रयत्न करताना दिसतात. या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी ४ हजार ९९९ रुपये देऊन तिकीट खरेदी करता येईल, अशी एक जाहिरात खूप व्हायरल होत आहे. तर आता त्यावर कपिलने मौन सोडलं आहे.
‘द कपिल शर्मा शो’ संदर्भातील एक जाहिरात सध्या लक्ष वेधून घेत आहे. त्यात असं लिहिलं आहे की, “जर तुम्हाला या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून सहभागी व्हायचं असेल तर ४ हजार ९९९ रुपये देऊन तुम्हाला तिकिटं खरेदी करता येतील.” पण आता यावर कपिलनेच खरं काय ते सांगितलं आहे. एक ट्वीट करत त्याने लिहिलं, “ही फसवणूक आहे. लाईव्ह शूटिंग पाहण्यासाठी आम्ही आमच्या प्रेक्षकांकडून एक रुपयाही घेत नाही. तुम्ही सर्वांनी अशा फसवणुकीपासून सावध राहा. असल्या कोणात्याही फंदात पडू नका. धन्यवाद.”
दरम्यान, या कार्यक्रमाने काही काळासाठी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. जुलै २०२३ मध्ये या हा कार्यक्रम बंद झाला. त्यामुळे आता हा कार्यक्रम पुन्हा कधी सुरू होईल याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.