‘बिग बॉस 18’ चा विजेता करणवीर मेहराची दुसरी पत्नी अभिनेत्री निधी सेठ हिने नुकतंच जानेवारी महिन्यात लग्न केलं. निधीचा पती संदीप कुमार हा बंगळुरूमध्ये बिझनेसमन आहे. दुसऱ्या लग्नानंतर निधी प्रचंड आनंदी आहे. निधी पहिल्यांदाच तिच्या पतीबद्दल आणि तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल व्यक्त झाली आहे. आयुष्य पुन्हा प्रेमाने भरलंय, असं वाटत असल्याचं निधीने म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निधी सेठ म्हणाली, “मला असं वाटतंय की माझे आयुष्य पुन्हा एकदा प्रेमाने भरले आहे. मलला माझ्यातही बरेच चांगले बदल जाणवत आहेत. माझ्या आजूबाजूला सकारात्मक विचारांचे लोक आहेत. संदीप परिपक्व, समजूतदार आणि पाठिंबा देणारा जोडीदार आहे.”

‘कामना’ आणि ‘श्रीमद भागवत महापुराण’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम करणारी निधी आता बेंगळुरूमध्ये स्थायिक झाली आहे. तिने अभिनय सोडला आहे का? असं विचारल्यावर ती म्हणाली, “सध्या, मी इंटिरिअर डिझायनिंग करतेय. हे काम मला आवडत आहे आणि त्यातच मी व्यग्र आहे. कारण त्यामुळे माझं काम आणि वैयक्तिक आयुष्य दोन्हीत संतुलन साधण्यास मला मदत होतेय. पण मला अभिनयासाठी चांगली ऑफर आली तर मी नक्कीच काम करेन. मला कशी भूमिका मिळते, त्यावरून मी काम करायचं की नाही ते ठरवेन,” असं निधीने नमूद केलं.

सोशल मीडियावर कोणतेही फिल्टर नाही – निधी

निधीचं यापूर्वी ‘बिग बॉस 18’ चा विजेता अभिनेता करण वीर मेहरा याच्याशी लग्न झालं होतं. त्यांचं नात कडवटपणामुळे संपलं होतं. करण बिग बॉसमध्ये असताना अनेकदा निधीचा विषय निघाला आणि त्याबद्दल बोललं गेलं, यावर निधीने नाराजी व्यक्त केली आहे. “दुर्दैवाने सोशल मीडियावर कोणतेही फिल्टर नाही, कोणीही खरं-खोटं तपासत नाही हे खेदजनक आहे. घटस्फोटानंतरची माझी एक जुनी मुलाखत ज्या प्रकारे वापरली गेली, ते पाहून मला धक्का बसला. काही लोकांना उगाच ड्रामा करण्यासाठी खोट्या गोष्टी पसरवायच्या असतात,” असं निधी म्हणाली.

निधीचा पती या सगळ्या गोष्टी कशा हाताळतो, तेही तिने सांगितलं. “खरं तर संदीपसाठी या गोष्टींना सामोरं जाणं फार अवघड नाही. कारण तो खूपच परिपक्व आहे. तसेच मी एक अभिनेत्री असल्याने माझं आयुष्य लाइमलाइटमध्ये असेल याची त्याला कल्पना आहे. तो माझ्यावर प्रेम करतो, मी जे काम करते त्यामुळे माझ्यावर प्रेम करत नाही,” असं निधी म्हणाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan veer mehra ex wife nidhi seth talks about husband sandiip kumar my life is filled with love hrc