२००० च्या सुरुवातीला आलेल्या ‘करिश्मा का करिश्मा’, ‘सोनपरी’, ‘शरारत’ या मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेतील कलाकार सध्या काय करतात याविषयी प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. विशेषतः या सर्व मालिकेतील बालकलाकार सध्या काय करतात याबद्दल प्रेक्षकांना जाणून घ्यायचे असते. याचबद्दलची नवी अपडेट समोर आली आहे. ‘करिश्मा का करिश्मा’ मधील रोबोट दाखवलेली अभिनेत्री झनक शुक्लाने लग्नगाठ बांधली आहे.
झनक शुक्लाने तिचा प्रियकर स्वप्नील सूर्यवंशीबरोबर लग्नगाठ बांधली आहे. १२ डिसेंबर २०२४ ला हा विवाह झाला आहे. या जोडप्याच्या लग्नामुळे त्यांच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असून चाहत्यांनी त्यांना या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा…जयदीप अहलावतच्या ‘पाताल लोक’ सीरिजच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा, चाहते म्हणाले, “हथोडा त्यागी…”
झनक शुक्लाने लग्नासाठी लाल रंगाची सोनेरी काठ असलेली सुंदर साडी परिधान केली होती, तर तिचा नवरा स्वप्नील सूर्यवंशी पांढऱ्या शेरवानीमध्ये अतिशय देखणा दिसत होता. नवविवाहित जोडप्याच्या पहिल्या फोटोमध्ये ते हातात हात घेऊन आनंदाने प्रेमाचा आणि एकत्रित प्रवासाचा आरंभ करताना दिसत आहेत. एका व्हिडीओ क्लिपमध्ये झनक शुक्लाची आई अभिनेत्री सुप्रिया शुक्ला हिरव्या रंगाची साडी आणि लाल ब्लाउज घालून दिसत आहे. त्या त्यांच्या होणाऱ्या जावयाला गंध लावताना दिसतात.
स्वप्नील सूर्यवंशी कोण आहे ?
स्वप्नील सूर्यवंशी हा मेकॅनिकल इंजिनीयर असून त्याचे एमबीए सुद्धा पूर्ण झाले आहे. त्याला आरोग्य आणि फिटनेसविषयी प्रचंड आवड आहे. तो अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन (ACSM) कडून प्रमाणित वैयक्तिक प्रशिक्षक आहे. तो लोकांना आरोग्यदायी व सक्रिय जीवनशैली अंगीकारण्यासाठी मार्गदर्शन करतो.
झनक शुक्लाने याचवर्षी जानेवारी महिन्यात साखरपुडा केला होता. २६ वर्षांच्या झनक शुक्लाने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘करिश्मा का करिश्मा’ या मालिकेत रोबोटिक गर्ल करिश्माची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने ‘वन नाइट विथ किंग’ या हॉलिवूड चित्रपटातही काम केले होते. तिने शाहरुख खानचा ‘कल हो ना हो’ या चित्रपटात प्रिती झिंटाची धाकटी बहीण जियाची भूमिका केली होती.