Kartiki Gaikwad : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे कार्तिकी गायकवाड घराघरांत लोकप्रिय झाली. या कार्यक्रमामध्ये कार्तिकीने गायलेलं ‘घागर घेऊन…’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. कार्तिकीला घरातूनच गाण्याचा वारसा लाभलेला आहे. आपल्या सुमधूर आवाजाने गायिकेने प्रेक्षकांचं मन बालपणीच जिंकून घेतलं होतं. शो संपल्यावर काही वर्षांनी कार्तिकी गाण्यांचे कार्यक्रम करू लागली. याशिवाय तिने विविध अल्बममध्ये देखील गाणी गायली आहेत. या सगळ्या प्रवासात कार्तिकीला तिच्या वडिलांचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्तिकीने त्यांना खास भेट दिली आहे.
कार्तिकी गायकवाड ( Kartiki Gaikwad ) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकताच गायिकेने तिच्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी कार्तिकीने आपल्या बाबांना छान असं सरप्राइज दिलं. तिने वाढदिवसाची भेट म्हणून आपल्या वडिलांसाठी खास टॅटू गोंदवून घेतला आहे. याचा खास व्हिडीओ कार्तिकीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
हेही वाचा : Video : लेकीला कडेवर घेत सासूसह दिल्या पोज! आलिया अन् राहा साजरं करणार रक्षाबंधन, मायलेकींचा पारंपरिक लूक चर्चेत
कार्तिकीने वडिलांसाठी गोंदवला खास टॅटू
कार्तिकीने ( Kartiki Gaikwad ) वडिलांसाठी स्वत:च्या हातावर “Daddy…” असं गोंदवून घेतलं आहे. लेकीच्या हातावरचा हा नवीन टॅटू पाहून तिचे वडील देखील आनंदी झाले होते. टॅटू दाखवताच कार्तिकीच्या वडिलांनी तिला जवळ घेतल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यानंतर कार्तिकी आपल्या वडिलांचे पाया पडून आशीर्वाद घेत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
कार्तिकीने ही पोस्ट शेअर करत वडिलांसाठी खास कॅप्शन लिहिलं आहे. गायिका लिहिते, “माऊली… माझं सर्वस्व असलेल्या आणि तुमच्या चरणी आयुष्य वाहिलेल्या माझ्या बाबांना आभाळाएवढं उदंड आयुष्य, आरोग्य, आनंद लाभो हीच माऊलींचरणी प्रार्थना आहे… तुमचा वाढदिवस खास आहे कारण, तुम्ही आमचं प्रेरणास्थान आहात या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्हीच तर खरा मान आहात! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा”
कार्तिकीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, गायिकेच्या ( Kartiki Gaikwad ) असंख्य चाहत्यांनी तिच्या वडिलांवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच कार्तिकीच्या नव्या टॅटूचं सर्वत्र कौतुक देखील करण्यात येत आहे.