गोविंदाची भाची आणि ‘बिग बॉस’ फेम आरती सिंह लवकरच दिपक चौहानबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. आरतीचा भाऊ अभिषेक शर्मा उर्फ कृष्णा आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह या लग्नाची सर्व तयारी पाहत आहेत. कृष्णा आणि कश्मीराने नववधू होणाऱ्या आरतीसाठी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. आरती या खास दिवशी कुटुंब आणि मित्रपरिवारासह आनंद साजरा करताना दिसली.
सध्या लग्नाची पूर्वतयारी सुरू आहे. यादरम्यान, गोविंदा लग्नाला उपस्थित राहणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण- कृष्णा आणि गोविंदाच्या कुटुंबातील संबंध काही फारसे चांगले नाहीत. तथापि, शर्मा कुटुंबाने गोविंदाला लग्नाची पत्रिका पाठवली आहे आणि अत्यंत आदराने गोविंदाला लग्नासाठी आमंत्रित केलं आहे.
‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल बोलताना कश्मीरा म्हणाली, “आम्ही लग्नात त्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत आणि आम्ही ते अत्यंत आदराने करू. परंपरेप्रमाणे मी त्यांच्या पाया पडेन. शेवटी, ते माझ्या सासऱ्यांच्या जागी आहेत आणि मी त्यांचा नक्कीच आदर करेन. त्यांना कदाचित माझी आणि कृष्णाची अडचण होत असेल पण आरतीचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते तिच्या लग्नात सहभागी होतील असं आम्हाला वाटतं.”
कश्मीरा पुढे म्हणाली, “आमच्यासाठी हा नक्कीच भावनिक क्षण आहे. याआधी हळदीच्या विधीच्या वेळी आम्ही सगळे खूप भावूक झालो होतो. मी जवळजवळ अठरा वर्षांपासून आरतीला ओळखते आणि तिचं लग्न एका सज्जन व्यक्तीशी होताना पाहून मला खूप जास्त आनंद होतोय. पण ती आता कोणाची तरी बायको होऊन आमच्यापासून दूर जाणार आहे याच थोडं वाईटदेखील वाटतं आहे.”
हेही वाचा… अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाचा भव्य मंडप ‘या’ ठिकाणी सजणार; ‘हे’ बॉलीवूड कलाकार लावणार हजेरी
आरती सिंहने तिचा होणारा पती दिपक आणि तिची भेट कशी झाली? याबद्दल एकदा सांगितलं होतं. आरती म्हणाली होती, “मागच्या वर्षी २३ जुलैला आम्ही पहिल्यांदा बोललो आणि ५ ऑगस्टला पहिल्यांदा भेटलो. नंतर भेटीगाठी वाढल्या आणि नोव्हेंबरमध्ये आम्ही लग्नाचं ठरवलं. पण दोन्ही कुटुंबानी होकार देईपर्यंत आम्ही पुढे गेलो नाही. १ जानेवारीला दिपकने मला दिल्लीतील माझ्या गुरुजींच्या मंदिरात लग्नासाठी मागणी घातली आणि मी हो म्हणाले. तिथेच साखरपुडा झाला, असं मी मानते.”
हेही वाचा… सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर आयुष शर्माचं विधान; म्हणाला, “हा काळ आमच्यासाठी…”
दरम्यान, आरती ३९ व्या वर्षी लग्न करत असून तिचं आणि दिपकचं अरेंज मॅरेज आहे. दिपक हा नवी मुंबईचा असून व्यावसायिक आहे. आरती सिंह आणि दीपक चौहान २५ एप्रिल २०२४ रोजी इस्कॉन मंदिरात लग्न करणार आहेत.