अभिनेत्री कौमुदी वलोकर(Kaumudi Walokar)ने नुकतीच लग्नगाठ बांधली. विविध व्हिडीओ, फोटो या माध्यमांतून तिच्या लग्नातील खास क्षण प्रेक्षकांना पाहता आले. अभिनेत्रीसह तिच्या कलाकार मित्रांनीदेखील कौमुदीच्या संगीत सोहळ्यातील, हळदीच्या कार्यक्रमातील व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर शेअर केले होतो. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्नातील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
कौमुदी वलोकरच्या लग्नातील खास क्षण…
कौमुदी वलोकरने नुकतीच आकाश चौकसेबरोबर लग्नगाठ बांधली आहे. आता अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आकाश व कौमुदी हे पारंपरिक वेशभूषेत आहेत. ते अत्यंत सुंदर दिसत आहेत. सप्तपदी व पूजा या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. आकाशने कौमुदीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले, तो क्षणही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. कौमुदी व आकाश दोघेही आनंदात दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना कौमुदी वलोकरने ‘लग्नसंस्कार’, अशी कॅप्शन दिली आहे. कौमुदीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तिची सहकलाकार व जवळची मैत्रीण अश्विनी महांगडेने “प्रेम”, अशी कमेंट करीत पुढे हार्ट इमोजी शेअर केली आहे.
कौमुदी वलोकरच्या लग्नाची काही दिवसांपासून मोठी चर्चा असल्याचे पाहायला मिळत होते. आई कुठे काय करते या मालिकेतील तिच्या सहकलाकरांनी तिच्यासाठी खास केळवण केले होते. अश्विनी महांगडे, अभिषेक देशमुख, त्याची पत्नी अभिनेत्री कृतिका देव, तसेच सुमंत ठाकरे यांनी तिच्यासाठी केळवणाचे आयोजन केले होते. कौमुदीनेदेखील त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर करीत आनंद व्यक्त केला होता. मालिकेतील पात्रे खऱ्या आयुष्यात कधी इतकी जवळची कशी बनली ते कळलंच नाही, असे म्हणत तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. याबरोबरच अभिनेत्रीच्या हळदीचे, मेंदीचे, संगीत सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. चाहत्यांनी त्यांवर प्रेमाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. कौमुदी वलोकरच्या पतीबद्दल आकाश चौकसेबद्दल बोलायचे, तर त्याने एज्युकेशन विषयात पीएच.डी. पूर्ण केलेली आहे. मेंदीच्या कार्यक्रमात त्याने त्याच्या हातावर कौमुदीसाठी मेंदी काढली होती. त्यावेळी तो खूपच चर्चेत आला होता.
कौमुदी वलोकर नुकतीच आई कुठे काय करते या मालिकेत नुकतीच दिसली होती. या मालिकेत तिने आरोही ही भूमिका साकारली होती. यशची पत्नी आरोहीच्या भूमिकेतून तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. आता या लोकप्रिय मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेनंतर अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील नवीन पर्वाला सुरुवात केली आहे. आता ती कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.