‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये देशभरातले स्पर्धेक सहभागी होत असतात. काही दिवसांपूर्वी अंदमान-निकोबार बेटांवरुन डॉ. समित सेन यांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. २२ वर्षांच्या ‘केबीसी’च्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारताच्या या भागातली एक व्यक्ती शोमध्ये दिसली होती. दर आठवड्याला या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे चेहरे पाहायला मिळतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन प्रत्येक स्पर्धकाशी आपुलकीने बोलत असतात. इतकी वर्ष ‘केबीसी’शी जोडले गेले असल्याने ते या कार्यक्रमाची ओळख बनले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कार्यक्रमाच्या नव्या भागाचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या भागामध्ये गुरुग्राममध्ये राहणाऱ्या रुची अमिताभ यांच्यासमोर हॉटसीटवर बसल्या होत्या. त्या पेशाने मीडिया अ‍ॅनलिस्ट (Media anaylist) आहेत. त्यांना हॉटसीटवर बसवल्यानंतर बच्चनसाहेब त्यांच्याशी गप्पा मारायला लागले. तेव्हा बोलताना रुची यांना त्यांनी “तुमचं आडनाव काय?” असे विचारले. या प्रश्नाचे उत्तर देताना त्या “आपलं नाव हीच आपली ओळख असते आणि त्यासाठी आडनावाची गरज नसते. मी लहानपणापासून आडनावाचा वापर करत नाही, लोक मला रुची म्हणूनच ओळखतात”, असे म्हणाल्या.

आणखी वाचा – अभिनेत्री सायली संजीवची सुबोध भावेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट चर्चेत, म्हणाली…

त्यांच्या या उत्तरावर बिग बी खूश झाले आणि त्यांनी ‘बच्चन’ या आडनावामागचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “माझ्या वडिलांना जातीच्या बंधनामध्ये अडकायचं नव्हतं. ते कविता करताना बच्चन या नावाचा वापर करायचे. मला शाळेमध्ये दाखल करताना शिक्षकांनी माझ्या वडिलांना आमचे आडनाव विचारले. त्याच क्षणी त्यांनी माझे आडनाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि शिक्षकांना ‘बच्चन’ असे लिहा हे सांगितले. तेव्हा मी पहिला बच्चन झालो.”

आणखी वाचा – अक्षय कुमारचा एक व्हिडीओ अन् ट्विटरवर सुरु झाला ‘#HeraPheri3’ चा ट्रेंड, जाणून घ्या नेमकं प्रकरण

काही वर्षांपूर्वी अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये याबद्दल लिहिले होते. “माझे वडील कायस्थ कुटुंबामध्ये जन्मले होते. त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते. त्या काळामध्ये कवी टोपणनावाने कविता करत असतं. माझ्या वडिलांनी कवितांसाठी बच्चन हे नाव स्वीकारले होते. जातीव्यवस्थेला विरोध करणाऱ्या माझ्या वडिलांनी मला शाळेमध्ये दाखल करताना आमचे आडनाव बदलले”, असा उल्लेख त्या ब्लॉगमध्ये आढळतो.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kbc 14 amitabh bachchan revealed how he got his surname yps