सूरज बरजात्या दिग्दर्शित ‘ऊंचाई’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवसांमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, बोमन इराणी आणि अनुपम खेर यांनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. या वर्षामधला अमिताभ यांचा पाचवा चित्रपट आहे. मागील काही महिन्यांपासून ते ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या कामामध्ये व्यग्र आहेत. सध्या या कार्यक्रमाचे चौदावे पर्व सुरु आहे. नुकताच या कार्यक्रमाच्या नव्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
या भागामध्ये ‘केबीसी’चा खेळ खेळण्यासाठी फोरम मकाडिया यांची निवड झाली. जेव्हा एखाद्या स्पर्धकाचा खेळ संपतो आणि त्याजागी नवा स्पर्धक खेळ सुरु करतो, तेव्हा अमिताभ त्याला हॉटसीटवर बसवतात. स्पर्धकाची व्यवस्था पाहिल्यानंतरच ते स्वत:च्या जागेवर जाऊन बसतात. या भागामध्ये फोरम निवड झाल्याच्या उत्साहाच्या भरात अमिताभ यांच्या जागेवर जाऊन बसतात. काही सेकंदांनी झालेली चूक त्यांच्या लक्षात येते. पुढे त्या पटकन गोंधळत खूर्चीवरुन उठतात. तेव्हा अमिताभ त्यांच्याकडे एकटक पाहत असल्याचे दिसते.
काही वेळासाठी बच्चनसाहेब हॉटसीटवर बसतात. फोरमकडे पाहत गंमतीमध्ये म्हणतात, “फोरमजी तुमच्यामुळे मी आज हॉटसीटवर बसू शकलो. मला किती आनंद झाला आहे हे तुम्हाला सांगू शकत नाही.” झालेल्या चुकीवर खजील होऊन त्या “आज सर्व काही उलट-सुलट घडत आहे”, असे म्हणतात. त्यांची प्रतिक्रिया ऐकून अमिताभ बच्चन हसत हसत “मला तुम्ही थोड्या विचित्र वाटलात. म्हणजे जायचं होतं तिकडे, आलात इकडे”, असे म्हणतात. त्याचे हे बोलणं ऐकून प्रेक्षकही हसायला लागतात.
पुढे फोरम “मी खूप वेंधळी आहे, आणि त्याच स्वभावामुळे मी कुठेही निघून जाते. पण शेवटी मी योग्य ठिकाणी पोहोचते”, असे म्हणतात. त्याच्या या विधानाने खूश होऊन प्रेक्षकांसह खुद्द अमिताभ बच्चन सुद्धा टाळ्या वाजवायला लागतात. गुजरातमधील राजकोट भागामध्ये राहणाऱ्या फोरम मकाडिया करविभागामध्ये कार्यरत आहेत. प्रोमो व्हिडीओमधला हा भाग आज प्रसारित होणार आहे.