KBC 14 Contestant Shashwat Goel 7.5 Crore Question: ‘कौन बनेगा करोडपती’चा मंगळवारचा भाग विशेष ठरला तो बीग बी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाबरोबरच एका खास कारणामुळे. हे कारण म्हणजे रोल ओव्हर कंटेस्टंट असलेला शाश्वत गोएल. शाश्वतने सोमवारच्या भागामध्ये ७५ लाखांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे मंगळवारी त्याला पहिलाच प्रश्न हा एक कोटींचा विचारण्यात आला. विशेष म्हणजे एक कोटींच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देत शाश्वत या पर्वातील दुसरा करोडपती ठरला. त्यातही त्याने साडेसात कोटींच्या प्रश्नाचं उत्तर देणार असा निर्धार व्यक्त करत त्या प्रश्नाचं उत्तरही दिलं पण ते उत्तर चुकलं आणि तो एक कोटींऐवजी केवळ ७५ लाख रुपये घरी घेऊन गेला.
एक कोटींसाठी शाश्वतला उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील भितरीमध्ये असणारा स्तंभ हा कोणत्या राजवटीमधील राजांची माहिती सांगण्यासाठी एक चांगला स्त्रोत असल्याचं मानलं जातं असा प्रश्न विचारण्यात आलेला. यासाठी पर्याय म्हणून शिशुनाग, गुप्त, नंद आणि मौर्य असे चार पर्याय देण्यात आले होते. बराच विचार करुन शाश्वतने गुप्त असं उत्तर दिलं. हे उत्तर बरोबर असल्याचं सांगत अमिताभ यांनीच येऊन शाश्वतला मिठी मारली.
साडेसात कोटींचा प्रश्न हा भारत ब्रिटीशांच्या ताब्यात जाण्यासंदर्भातील होता. भारतामध्ये तैनात झालेली पहिली ब्रिटीश सैन्याची तुकडी म्हणून कोणत्या तुकडीला ‘प्राइम इन इंडिस’ असं नाव देण्यात आलं होतं? असा प्रश्न सात कोटींसाठी विचारण्यात आला. शाश्वतला या प्रश्नासाठी कोणतीही लाइफलाइन वापरता येणार नव्हती. मात्र त्याने अमिताभ यांच्याकडून आपलं उत्तर चुकलं तर नेमके किती रुपये आपल्याला मिळतील असं विचारलं. या प्रश्नावर अमिताभ यांनी ७५ लाख असं उत्तर दिलं. त्यामुळेच उत्तर चुकलं तर २५ लाखांचा फटका बसेल मात्र बरोबर आलं तर थेट साडेसात कोटी रुपये जिंकू असं म्हणत शाश्वतने आपण या प्रश्नाचं उत्तर देणार असं सांगितलं आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.
या प्रश्नाला
ए) ४१ वी (वेल्च) रेजिमेंट ऑफ फूट
बी) पहिली कोल्डस्ट्रीम गार्ड
सी) पाचवी लाइट इफ्रेंट्री
डी) ३९ वी रेजिमेंट ऑफ फूट
असे पर्याय देण्यात आले होते.
शाश्वतने बराच वेळ विचार करुन डी असं उत्तर दिलं. त्यावर अमिताभ यांनी लॉक करु का असं विचारलं असता शाश्वतने आपलं उत्तर बदलून ‘ए’ पर्याय निवडला. ‘४१ वी (वेल्च) रेजिमेंट ऑफ फूट लॉक करा’ असं शाश्वतने सांगितलं आणि त्यानंतर अमिताभ यांनी एक दिर्घ श्वास घेतला आणि हे उत्तर चुकीचं असल्याचं सांगितलं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे पर्याय ‘डी’ ‘३९ वी रेजिमेंट ऑफ फूट’ होतं.
मात्र ज्या पद्धतीने शाश्वत खेळला ते पाहून अमिताभही फारच प्रभावित झाल्याचं दिसून आलं. आपल्या आईच्या प्रोत्साहनामुळे आपण इथपर्यंत पोहचल्याचं सांगत शाश्वत भावूक झाला. शाश्वतच्या आईचं करोनाच्या कालावधीमध्ये निधन झालं. त्याने कम्पॅनियन म्हणून आईच्या जागी कोणालाच आणलं नव्हतं. त्याच्या दिवंगत आईसाठी खुर्ची रिकामी सोडण्यात आलेली. ७५ लाखांचा चेक घेतल्यानंतर सेटवरुन जाण्याआधी तो त्या सीटजवळ जाऊन रडल्याचंही पहायला मिळालं.