अमिताभ बच्चन गेल्या दोन दशकांपासून ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमादरम्यान ते कधी त्यांच्या सिनेमातील डायलॉग्स सादर करतात, कधी कविता म्हणतात, तर अनेकदा त्यांच्या आयुष्यातील किस्से सांगतात. नुकत्याच एका भागात अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाबरोबर एक किस्सा शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांचा लंडनमध्ये एका दुकानदाराने अपमान केला होता. मात्र, अमिताभ यांनी त्याला चांगलंच उत्तर दिलं होतं.
‘कौन बनेगा करोडपती १६’ च्या एका ताज्या भागात स्पर्धक प्रणती पैदिपतीने अमिताभ यांना विचारलं की, “तुम्ही वस्तू खरेदी करताना त्याची किंमत बघता का?” यावर उत्तर देताना अमिताभ बच्चन यांनी त्यांचा लंडनमधील एक अनुभव सांगितला. ते म्हणाले, “वस्तूची किंमत पाहणं हे स्वाभाविक आहे. एकदा मी लंडनमध्ये टाय खरेदी करण्यासाठी गेलो होतो. मी टाय पाहत असताना, दुकानदाराने मी ते विकत घेऊ शकणार नाही असं गृहित धरून ‘याची किंमत १२० पाऊंड आहे’ असं सांगितलं. मी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं, ‘यातील दहा टाय माझ्यासाठी पॅक करा.”
हेही वाचा…कर्करोगावर मात करणाऱ्या महिमा चौधरीने हिना खानची घेतली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली….
अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, “अशा प्रसंगांमध्ये भारतीयांचे धैर्य आणि आत्मविश्वास दाखवण्याची गरज असते. कोणीही आपल्याला कमी लेखू नये, यासाठी कधी कधी त्यांना धडा शिकवावा लागतो.”
अमिताभ बच्चन, केबीसी, आणि लंडन यांचं विशेष कनेक्शन आहे. २०२० मध्ये या शोला २० वर्षे पूर्ण होत असताना, स्टार टीव्हीचे माजी कार्यक्रम प्रमुख समीर नायर यांनी ‘स्पॉटबॉय’ईला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, सुरुवातीला अमिताभ यांनी ‘केबीसी’ शोमध्ये सहभागी होण्यास संकोच व्यक्त केला होता. मात्र, अमिताभ समीरबरोबर लंडनला ‘हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेअर’चे टेपिंग पाहण्यासाठी गेले आणि परतीच्या फ्लाइटमध्ये ‘केबीसी’ होस्ट करायला तयार झाले.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी २००७ मध्ये आलेला ‘कौन बनेगा करोडपती’चा एकमेव सीझन सोडला तर आजवर सर्व सीझन्सचं सूत्रसंचालन केलं आहे. २००७ मध्ये शाहरुख खानने या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं.दरम्यान, अमिताभ बच्चन नुकत्याच आलेल्या ‘कल्की २८९८ एडी’ या सिनेमात प्रभास आणि दीपिका पदुकोणबरोबर दिसले होते, तर ‘वेतायन’ या आगामी सिनेमात अमिताभ बच्चन रजनीकांत यांच्याबरोबर दिसणार आहेत.