काही मालिकेतील दृश्ये ही भीतीदायक असतात. भूत, राक्षस अशा संकल्पना असलेल्या मालिका बघताना प्रेक्षक घाबरतात. मात्र, तरीही या अशा आशयाचे कथानक असलेल्या मालिका प्रेक्षकांची उत्सुकता टिकवतात. त्यामुळे अशा चित्रपट, मालिकांचा प्रेक्षकवर्गही मोठा असलेला पाहायला मिळते. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी'(Satvya Mulichi Satvi Mulgi) ही अशाच लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ‘झी मराठी’ वाहिनीने या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

केदारने दिली नेत्राला धमकी

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरूवातीला पाहायला मिळते की केतकी व केदार एका खोलीत बसले आहेत. केतकी रडत आहे. केदार केतकीला म्हणतो, “ते काही नाही, त्याने आताच्या आता तुझी माफी मागायला हवी. चल”, असे म्हणून केदार बसलेल्या जागेवरून उठतो. तितक्यात त्याचा फोन वाजतो. तो मोबाईलमध्ये पाहतो. मोबाईलमध्ये आलेला मेसेज वाचून तो केदारला धक्का बसल्याचे त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. केदार मनातल्या मनात नेत्राचा मेसेज वाचतो. तो मेसेज असा, “तुम्हाला काय वाटलं? एवढा मौल्यवान व्हिडीओ माझ्या एकटीच्या मोबाईलमध्ये ठेवला असेल?” याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, केदार व नेत्रा यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. नेत्रा केदारला म्हणते, “तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. सोडून द्या ना आता मनातला राग. विसरून जा सगळे हेवेदावे”, असे म्हणून नेत्रा तिथून निघून जात असते. तेवढ्यात केदार म्हणतो, “माझा जीव गेला तरी मी आता मागे हटणार नाही. आता मला व्यवस्थित कळलंय, मला जर हे घर उद्ध्वस्त करायचं असेल तर सगळ्यात आधी ही भींत मला सगळ्यात आधी उद्ध्वस्त करावी लागेल. तुला मी कसं उद्ध्वस्त करतो, तू ते बघच”, अशी धमकी केदार नेत्राला देतो.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “केदारमुळे नेत्राच्या आयुष्यात कोणते नवे वादळ येणार?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, केदारला नेत्राचे घर उद्ध्वस्त करायचे आहे. त्यासाठी तो अनेकविध मार्ग अवलंबताना दिसतो. त्याने याआधी मैथिलीला मारण्याचादेखील प्रयत्न केला आहे. याबरोबरच, तो नेत्राच्या मुलीला रीमाला तिच्या आईबद्दल चूकीच्या गोष्टी सांगत असल्याचे पाहायला मिळते. तिच्याकडून तो त्याची कामे करून घेतो. केदार घरातील सर्वांना चांगले वागण्याचे नाटक करून फसवतो. ही गोष्ट नेत्रा, तिचे सासरे व मैथिलीला माहित आहे. याचा त्यांनी व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ दाखवून नेत्रा केदारला काही गोष्टी करण्यास भाग पाडते. मात्र, केदार रीमाला नेत्राचा मोबाईल आणायला सांगतो व तो व्हिडीओ डिलिट करतो. आता केदारने नेत्राला स्पष्ट धमकी दिल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: नागा चैतन्यशी लग्नगाठ बांधण्याआधी सोभिताने शेअर केले ‘पेल्ली कुथुरु’ समारंभाचे फोटो; ही तेलुगू प्रथा आहे तरी काय?

दरम्यान, आता केदार पुढे कोणते पाऊल उचलणार, तो नेत्राला बाजूला करण्यासाठी काय करणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागल्याचे पाहायला मिळत आहे.