सध्या मराठी मालिकाविश्वात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. काही नव्या मालिका सुरू झाल्या आहेत, तर काही येऊ घातल्या आहेत. पण दुसऱ्याबाजूला बऱ्याच मालिका निरोप घेत आहेत. या सगळ्यात अशा काही मालिका आहेत, ज्यांना एक वर्षही पूर्ण झालं नाहीये. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सात महिन्यांपूर्वी सुरू झालेली मालिका ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ऑफ एअर होणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण वाहिनीकडून अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाहीये. अशातच आता पाच महिनेही पूर्ण न होता एक लोकप्रिय मालिका गाशा गुंडाळणार असल्याचं समोर आलं आहे.
मराठी मालिकाविश्वात अशा बऱ्याच मालिका आहेत, ज्यांनी पाच ते दहा वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या मालिकांनी प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं. ‘चार दिवस सासूचे’, ‘वादळवाट’, ‘पुढचं पाऊल’, ‘देवयानी’ आणि सध्याची ‘आई कुठे काय करते’ अशा बऱ्याच मालिका आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान निर्माण केलं आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून अनेक मालिका काही महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेताना पाहायला मिळत आहेत. कधी सुरू होतात आणि कधी संपतात, हेच कळेनास झालंय. याचं मुख्य कारण आहे टीआरपी. मालिकेला कमी टीआरपी असल्यामुळे अचानक मालिका बंद होताना दिसत आहे.
हेही वाचा – ना ऋषी ना रणबीर, भट्ट कुटुंबातील ‘या’ सदस्यासारखी दिसते राहा कपूर, आलियाच्या वडिलांनी केला खुलासा
‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘खरंच तिचं काय चुकलं?’ ही मालिका आता ऑफ एअर होणार असल्याचं समोर आलं आहे. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. अभिनेता रोशन विचारे, ज्योती निमसे, भाग्यश्री दळवी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने अलीकडेच १०० भागांचा टप्पा पूर्ण केला होता. पण आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं. पण अजून मालिकेचा शेवटचा भाग कधी प्रसारित होणार? हे समोर आलेलं नाही.
हेही वाचा – “माझी नवीन गाणी पाठवतो…”, जॉन सीनाने गायलेलं ‘ते’ गाणं ऐकून शाहरुख खानची प्रतिक्रिया, म्हणाला…
दरम्यान, गेल्या महिन्यात ‘सोनी मराठी’वरील ‘खुमासदार नात्याचा गोडा मसाला’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही देखील मालिका ३ ऑक्टोबर २०२३ सुरू झाली होती. पण अवघ्या तीन महिन्यात या मालिकेने देखील गाशा गुंडाळला. १२ जानेवारीला ‘खुमासदार नात्याचा गोडा मसाला’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला.