Khatron Ke Khiladi 15: ‘बिग बॉस’ संपल्यानंतर प्रेक्षक वर्ग ‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोची आतुरतेने वाट पाहत असतात. स्टंटवर आधारित असलेल्या ‘खतरों के खिलाडी’चे आतापर्यंत १४ पर्व यशस्वी पूर्ण झाले आहेत. यंदा ‘खतरों के खिलाडी’चं १५वं पर्व असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘खतरों के खिलाडी’च्या १५व्या पर्वाची चर्चा सुरू आहे. या पर्वासाठी अनेक लोकप्रिय कलाकारांना विचारणा केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मलायका शेरावत ‘खतरों के खिलाडी’च्या १५व्या पर्वात झळकणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर आता आणखी दोन नावं समोर आली आहेत.
रोहित शेट्टीच्या लोकप्रिय ‘खतरों के खिलाडी’च्या १५व्या पर्वासाठी भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पूर्वाश्रमीची पत्नी, नृत्यदिग्दर्शिका धनश्री वर्मा विचारणा झाली आहे. याशिवाय ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमुळे चर्चेत आलेली अपूर्वा मखीजादेखील ‘खतरों के खिलाडी’च्या १५व्या पर्वासाठी विचारण्यात आलं आहे. IWMBuzz च्या रिपोर्टनुसार, दोघींना ‘खतरों के खिलाडी’च्या १५व्या पर्वासाठी संपर्क करण्यात आला आहे. निर्माते आणि धनश्री, अपूर्वामध्ये सातत्याने यासंबंधीत बातचीत होतं आहे. त्यामुळे धनश्री व अपूर्वा ‘खतरों के खिलाडी’च्या १५व्या पर्वात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, धनश्री वर्मा, अपूर्वा मखीजा व्यतिरिक्त पारस छाबडा, ईशा सिंह, अविनाश मिश्रा, दिग्विजय सिंह राठी, चुम दरांग, मोहसिन खान, सिद्धार्थ निगम, बसीर अली, गुल्की जोशी, भाविका शर्मा, गोविंदाची भाची रागिणी खन्ना हे कलाकार ‘खतरों के खिलाडी’च्या १५व्या पर्वात झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर एल्विश यादव आणि अभिषेक मल्हानने थेट ‘खतरों के खिलाडी’च्या १५व्या पर्वासाठी नकार दिला आहे.
धनश्री वर्माबद्दल बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी तिचा युजवेंद्र चहलशी घटस्फोट झाला. २० मार्चला मुंबईतील वांद्रे फॅमिली कोर्टात दोघांच्या घटस्फोटाची सुनावणी झाली. ८ ऑगस्ट २०२० मध्ये धनश्री व चहलचा साखरपुडा झाला होता. आयपीएलवरून परतल्यानंतर २२ डिसेंबर २०२०मध्ये दोघं लग्नबंधनात अडकले. मोठ्या थाटामाटात धनश्री व चहलचं लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघं सतत एकत्र दिसायचे. तसंच सोशल मीडियावर एकत्र रील व्हिडीओ करायचे. पण, २०२३मध्ये धनश्री व चहलच्या नात्यात तेढ निर्माण होतं असल्याचं समोर आलं. यावेळी दोघं विभक्त होण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र, तेव्हा ही अफवा असल्याचं दोघांनी सांगितलं. अखेर लग्नाच्या चार वर्षांनंतर धनश्री व युजवेंद्र चहलचा संसार मोडला.