सोशल मिडिया असं माध्यम आहे, ज्याचा उपयोग सामान्यांपासून ते श्रीमंतापर्यंत आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळेच करतात. ज्यावर अनेकविध पद्धतीचा कंटेट शेअर केला जातो. मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारही सोशल मीडियाचा वापर करीत त्यांच्या आयुष्यातील अनेकविध गोष्टी शेअर करताना दिसतात. आता अभिनेत्री मयुरी देशमुख(Mayuri Deshmukh)ने सोशल मीडियावर असणं किती महत्वाचं वाटतं, यावर भाष्य केले आहे.
सोशल मीडियाबाबत काय म्हणाली अभिनेत्री?
अभिनेत्री मयुरी देशमखने सुलेखा तळवलकरांच्या दिल के करीब या युट्युब चॅनेला मुलाखत दिली. या मुलाखतीत, सोशल मीडियावर असणं,नसणं तुला किती महत्त्वाचं वाटतं? असे विचारले. यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “मी अगदी प्रामाणिकपणे सांगते मला महत्त्वाचं वाटत नाही. मी या फील्डमध्ये नसते तर किंबहुना माझं सोशल मीडिया अकाउंट देखील नसतं. मी सोशल मीडिया अकाउंट देखील का उघडलं माहितेय? कारण ‘खुलता कळी खुलेना’नंतर माझ्या नावाने पाच – सहा फेक अकाउंट्स तयार झाले होते, तेही २०-३० हजार फॉलोअर्स असलेले. तेव्हा मला माझे सहकलाकार म्हणाले की, तुला कधी स्वत:चं म्हणणं मांडायचं असेल, तर तुझ्याकडे एक सोशल मीडिया प्लॅटफ़र्म हवा, जो अधिकृतपणे तुझा असेल, त्यामुळे मी ते सुरू केलं”.
“सुरुवातीला मला असं झालं की, का फोटो टाकायचे? का आपलं खाजगी आयुष्य शेअर करायचं? पण नंतर मला एक समतोल साधता आला. की किती माझ्याबद्दल सांगायचं आणि कसं बोलायचं. त्या प्लॅटफॉर्मवर तुमचे चाहते आणि तुमचं काम बघणारे लोक असतात, त्यामुळे त्यांच्याशी जोडले जाण्याचे ते एक चांगले माध्यम आहे”.
“पण मला वैयक्तिकरित्या मी सोशल मीडियाची फार मोठी चाहती नाही. कारण कुठे तरी आपण सगळेच तिथे आपलं जे उत्तम असतं, ते शेअर करतो. ज्यामध्ये मी बेस्ट दिसत असेल तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला जातो. पण मी माझे हळवे क्षण किती वेळा तुमच्यासमोर आणते? ते त्या सोशल मीडियावर नाही आणत. अशावेळी कमकुवत मनाचा एखादा व्यक्ती तुमचं अकाउंट फॉलो करत असेल, तर त्याला वाटू शकतं की हीचं आयुष्य फारच भारी आहे, माझं का नाहीये आणि ते चुकीचं आहे”.
“मीच दुःखी आहे बाकी सगळे मजा करतायत ही वस्तुस्थिती नाहीये, सोशल मीडिया अजिबात वास्तव नाहीये. मला वाटतं हे समजून सोशल मीडियाचा वापर करा, हे समजून करत नसाल तर ते अत्यंत धोकादायक आहे”, असंही मयुरी म्हणाली.
“मी परत जेव्हा जोमाने लिखाणाकडे वळले तेव्हा लक्षात आलं की सोशल मीडिया किंवा मोबाईल फोन हे किती मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. क्रिएटीव्हीटीला हे किती मारतं. मी फार फोनचा वापर करत नाही. पण मला जाणवलं की तो डोपिमीन इफेक्ट आहे, फोनकडे हात जातो. तर मी कधीकधी फोन दुसर्या खोलीत लॉक करते आणि मग लिखाणाला बसते, कारण ते एखाद्या वेसनासारखे आहे”, असेही मयुरीने मुलाखतीत पुढे बोलताना सांगितले.
सोशल मीडियावरील चांगल्या वाईट अनुभवाबद्दल विचारले असता मयुरी म्हणाली की, “जे खरंच तुमच्यावर प्रेम करतात, संबंध नसताना चांगल्या प्रतिक्रिया देतात, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुम्हाला चांगलं वाटतं. पण आपली मानसिकता अशी आहे की, तीनशे कंमेंट चांगल्या असतील आणि एक वाह्यात, ट्रोलरची कमेंट असेल तर ती लक्षात राहते. त्यामुळे मी ठरवलं आहे की, तीनशे कमेंट बघू, त्या एका कमेंटकडे लक्ष नको जायला. मी फार उत्तर द्यायला जात नाही”.