‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय शोच्या तिसऱ्या पर्वाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ४ जूनपासून या शोच्या नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे. अवधूत गुप्ते या शोचं सूत्रसंचालन करत आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ शोच्या तिसऱ्या पर्वातील पहिल्या भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी झाले होते.
राज ठाकरेंनी ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली. काही प्रश्नांना त्यांच्या स्टाइलमध्ये उत्तरं देत राज ठाकरेंनी कार्यक्रमात रंगत आणली. ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमधील राज ठाकरेंचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या शोमध्ये राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंबरोबरचा एक व्हिडीओ दाखविण्यात आला होता. तो व्हिडीओ पाहून राज ठाकरे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. या व्हिडीओनंतर आता उद्धाव ठाकरेसुद्धा खुपते तिथे गुप्तेमध्ये हजेरी लावणार का? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
अवधूत गुप्तेने ‘खुपते तिथे गुप्ते’च्या निमित्ताने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला “शोमधील हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. पण, हा प्रश्न राज ठाकरेंना विचारताना तुझ्या मनात घालमेल सुरू होती का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अवधूत म्हणाला, “तशी काही घालमेल नव्हती. मी पत्रकार नाही किंवा हे न्यूज चॅनेल नाही. खुपणाऱ्या गोष्टी सांगणं, हा कार्यक्रमाचा गाभा जरी असला, तरी तो कार्यक्रमाचा टोन नाही. त्यामुळे मनात भीती नव्हती.”
“या व्हिडीओतील एक व्यक्ती आम्हाला खूर्चीवर दिसली. दुसरी पण दिसणार का?”, असा प्रश्नही अवधूत गुप्तेला विचारला गेला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, “हो माझी भयंकर इच्छा आहे. मी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आहे. त्यावर त्यांनी बघू असं उत्तर दिलंय. त्यामुळे ते कधी येतील, याची मी वाट बघतोय.”