मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय व लाडक्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे खुशबू तावडे व संग्राम साळवी. २०१८ साली दोघं लग्नबंधनात अडकले. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२१मध्ये खुशबू व संग्राम आई-बाबा झाले. अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव राघव आहे. दरम्यान, खुशबू व संग्रामची लव्हस्टोरी सर्वश्रृत आहे. ‘देवयानी’ या मालिकेच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली, हे बऱ्याच जणांचा माहित आहे. पण या मालिकेच्या आधी दोघांची भेट झाली होती, ज्या भेटीत खुशबूला अजिबात संग्राम आवडला नव्हता. हा किस्सा नुकताच खुशबूने एका मुलाखतीत सांगितला.
अभिनेत्री खुशबू तावडे व संग्राम साळवी नुकतेच अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या ‘अगं आणि अहो’ या कार्यक्रम सहभागी झाले होते. यावेळी दोघांनी पहिला भेटीचा किस्सा सांगितला. संग्राम म्हणाला, “५ मार्च २०१४. ‘देवयानी’ मालिकेचं डे-नाइट शूट होतं. त्या दिवशी खुशबूचं ‘देवयानी’ मालिकेच्या सेटवरील पहिलं शूट होतं. मी सेटवर जाणार जेवढे काही डायलॉग आहे, तेवढे वाचणार. शॉट द्या, संपलं. बाकी काही नाही, असं खुशबूचं ठरलं होतं. ही तयार होऊन आली. ज्युनिअर्स बसले होते, स्टेज बांधला होता आणि हार्मोनियम होता. काहीतरी आता व्हायला पाहिजे म्हणून आम्ही तिथे बसून गाणी गात होतो. ही जशी आली तसं सगळं काही थांबलं. तेव्हा मी खुशबूला ‘देवयानी’ मालिकेच्या सेटवर पहिल्यांदा पाहिलं. शूट सुरुच होतं. पहाटे साडे-तीन, चार वाजले होते. तेव्हा मला लक्षात आलं, की मी भाजी भाकरी आणली आहे. मग मी लगेच ते काढलं आणि सगळ्यांना बोलावलं. खुशबू बाजूलाच बसली होती, हिला म्हटलं घे. ही नाही म्हणाली. मी म्हटलं, खाना चांगलं घरचं आहे. मग हिने एक तुकडा जबरदस्ती घेऊन खाला. ही आमची पहिली भेट.”
हेही वाचा – “अभिनंदन बायको!” मुग्धा वैशंपायनला पदव्युत्तर पदवी; प्रथमेश लघाटे आनंद व्यक्त करत म्हणाला, “तुझा खूप…”
त्यानंतर खुशबू म्हणाली, “पण खरंतर याआधी आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. जेव्हा माझी ई-टीव्हीवरची ‘एक मोहोर अबोल’ मालिका सुरू होती आणि याची ‘देवयानी’ मालिका सुरू होती. दोन्ही मालिकेचं शूट गोरेगावमधल्या एकचा बिल्डिंगमध्ये होतं. तिथे याचं डे-नाईट सुरू असायचं आणि आमचं सात ते सात शूट सुरू असायचं. बँकेत जॉब असल्यासारखं शनिवार-रविवार सुट्टी मस्त. अगदी सगळं व्यवस्थित आणि हे झोपेतून उठतायत, दगदग करतायत. मी एकदा आले तेव्हा संग्राम बाहेर बसून ब्रश करत होता. तर मला असं झालं होतं, हे शूटिंगचं चाललंय ना? तिथे मला हा अजिबात आवडला नव्हता.”
दरम्यान, खुशबू व संग्रामच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, संग्राम सध्या ‘सन मराठी’वरील ‘कन्यादान’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. तर खुशबू ‘झी मराठी’वरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत काम करत आहे.