मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी उपोषण मागे घेतलं. त्यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. तसेच उपोषण मागे घेताना राज्यभरात मराठा समाजाचं साखळी उपोषण चालूच राहील, असं ते म्हणाले. राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला अभिनेते किरण माने पाठिंबा देत आहेत. आंदोलकांनी शांततेने व कोणत्याही समाजाला कमी न लेखता आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करावं, असं त्यांचं म्हणणं आहे.
किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे. आरक्षणाची मागणी उचलून धरताना आंदोलकांनी इतर कोणत्याही समाजाचा अपमान करू नये, असं त्यांनी म्हटलं आहे. “मराठा बांधवांनो…आपल्या महामानवांनी कधीही दुसर्या समाजाला कमी लेखलं नाही. तुकोबारायांनी विठ्ठलामध्ये बुद्धाला पाहिलं. छत्रपती शिवरायांनी सिद्दी इब्राहीमला अंगरक्षक पद दिलं. शाहूराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा विश्वरत्न घडवला! आरक्षणाला समर्थन देताना परजातीला कमी लेखणे किंवा भावनेच्या भरात कुणाची तुलना असामान्य महामानवांशी करून कटुता आणणे या गोष्टी त्वरित थांबवा. आपली लढाई स्वबळावर लढुया, कुणाला कमी लेखून नाही,” असं किरण माने पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
दरम्यान, किरण माने वेळोवेळी पोस्ट करून मराठा आरक्षणाबद्दल मत मांडत असतात. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चालू असताना मानेंनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. इतकंच नाही तर मराठा आरक्षणासाठी आत्महत्या न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. उतावीळ होऊन अशी जीवघेणी पावलं उचलू नका असं ते म्हणाले होते.