मराठी अभिनेते किरण माने सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते अनेक सामाजिक व राजकीय विषयांवर त्यांची स्पष्ट मतं मांडत असतात. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी साताऱ्यातील मराठा आंदोलकांची भेट घेत पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता माने यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबद्दल तसेच त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त करणारी एक पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“यापुढे माझं कुटुंब माझ्यासमोर आणू नका, कारण…”; खवळलेल्या मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे मनोज जरांगे पाटील यांनी दाखवून दिल्याचं किरण माने यांनी म्हटलं आहे. “जरांगे पाटील… या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय. खरंतर असं पूर्वी घडणं सहज शक्य होतं, कारण व्यवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पाहणार्‍या व्यवस्थेला तो धाक ‘दाखवण्याचं’ महान कार्य तुम्ही करत आहात! तब्येतीला सांभाळा. आम्हाला तुमची गरज आहे,” अशी पोस्ट किरण माने यांनी फेसबुकवर केली आहे.

किरण माने यांची पोस्ट

किरण माने यांनी दोन दिवसांपूर्वीही मराठा आंदोलनाबद्दल भाष्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी मराठा तरुणांना आरक्षणासाठी आत्महत्या न करण्याचा सल्ला दिला होता. “मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ‘करो या मरो’ या स्टेजवर आलाय. लढा द्यायलाच हवा, पण असे वयोवृद्ध लोक मैदानात उतरल्यामुळं त्यांच्या प्रकृतीची लै काळजी वाटायला लागलीय. आज एका तरण्याबांड भावानं आत्महत्या केली. चार दिवसांपूर्वी एकानं स्वत:ला संपवलं होतं. एकानं गाड्या फोडल्या… इतकं इमोशनल होऊन कसं चालंल माझ्या भावांनो! आपली ताकद मोठी हाय. शांततेत काम केलं तरी पुरेसं हाय. वाघाच्या अस्तित्वात आणि डरकाळीत दहशत असते. समोरचा कितीही माजलेला असला तरी एका डरकाळीत जागेवर थरथरला पायजे. कशाला उतावीळ होऊन टोकाचे निर्णय घ्यायचे?” असं माने म्हणाले होते.

“समोरचा कितीही माजलेला असला तरी…”, मराठा आरक्षणाबद्दल किरण मानेंची पोस्ट; म्हणाले, “अशा आंदोलनांचा इतिहास…”

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदा उपोषण केलं, तेव्हा ते मागे घेताना राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. सरकारने ती मुदत न पाळल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मागच्या ५ दिवसांपासून ते उपोषण करत आहेत. राज्यातील इतर भागातही जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज उपोषण करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran mane post on manoj jarange patil hunger strike for maratha reservation hrc