काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयातून अलीकडेच दिलासा मिळाला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवकुमार यांना २०१९ मध्ये अटक केली होती. तसेच त्यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल ३०० कोटी जप्त करण्यात आले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने डी.के. शिवकुमार यांच्या विरोधातील मनी लाँडरिंगचं प्रकरण रद्द केलं आहे. यासंदर्भात अभिनेते व शिवसेना ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं प्रकरण काय?

आयकर विभागाने सात वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ मध्ये डी.के.शिवकुमार यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले होते. आयकर विभागाच्या कारवाईनंतर ईडीने त्यांच्याविरोधात कारवाई सुरू केली होती. त्यावेळी शिवकुमार यांनी याला सूडाचं राजकारण सुरु असल्याचं म्हटलं होतं. २०१९ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेत त्यांनी ईडीने जारी केलेलं समन्स रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु, त्याठिकाणी दिलासा न मिळाल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली. अखेर आता त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. याबाबत आता किरण मानेंनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : तारीख अन् वेळ ठरली! ‘झी मराठी’वर सुरू होणार दोन नव्या मालिका, प्रोमो आले समोर…

किरण मानेंची पोस्ट

ईडीचा सापळा फाडून वाघ सुटला! खरा जिगरबाज. बघा रे, ईडीला घाबरून सत्ताधार्‍यांच्या वळचणीला गेलेल्या भेकडांनो… तुमच्यावर पुढच्या पिढ्या कुत्सितपणे हसणार आहेत… पण या डी.के. शिवकुमार सारख्या सच्चा लढवय्याला डोक्यावर घेऊन नाचणार आहेत. मेंदूत कोरून ठेवा. त्रास सहन करून स्वत्व टिकवणार्‍या स्वाभिमानी योद्ध्यांची नावं इतिहास सुवर्णाक्षरात कोरतो. लाचारी पत्करून तात्पुरती पदं मिळवणार्‍या भेकडांना उकीरड्यावर फेकून देतो.

काँग्रेस पक्षाचा कर्नाटकातला हा खंदा वीर… द रियल हिरो डी.के.शिवकुमार! माजी उर्जामंत्री. ईडीची चौकशी झेलली छाताडावर. सत्ताधार्‍यांना भिक घातली नाही. मनी लॉंडरींगच्या केसेस झाल्या. बदनामी झाली. पन्नास दिवस तुरूंगवास सोसला. सहा वर्ष झुंज दिली… आणि काल सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या केसेस ‘बोगस’ असल्याचे सांगत डी. के. शिवकुमार यांची निर्दोष मुक्तता केली!

डी.कें.नी इतर बुXX नेत्यांप्रमाणे शेपूट घालून सत्तेत प्रवेश केला असता तर मुख्यमंत्रीही झाले असते. पण जनतेत छी थ्थू झाली असती. लोकांच्या नजरेतून कायमचे उतरले असते. पद आणि खोकी येतात तशी जातातही. पण ‘इज्जत’ आणि ‘बाणेदारपणा’ हजारो वर्ष तुमचं नाव टिकवतो! ईडीची धाड पडली की मिडीयावाल्यांच्या हिंस्त्र झुंडी बदनामी करायला मोकाट सोडली जातात…पण हा वाघ सुटून आल्यावर त्यांच्यावर खोट्या केसेस लादणार्‍या व्यवस्थेला जाब विचारणारा एकही ‘माई का लाल’ आज मिडीयात शिल्लक नाही. इतिहासातल्या सगळ्यात नीच स्तरावर आपल्या देशाची लोकशाही पोहोचली आहे याचा हा पुरावा. असो.

डी.के. खरंतर तुमची हत्तीवरुन मिरवणूक काढावीशी वाटतीये. तुमच्या संघर्षाला लवून मुजरा घालावासा वाटतोय. पण एक लक्षात ठेवा, बदनामीचे घाव झेलूनही वर्चस्ववाद्यांपुढे न झुकलेल्या महामानवांना या देशाने कायम मनामेंदूत कोरून ठेवले आहे. आम्हाला त्यासाठी खोटे सिनेमे काढून कुणाची खोटी भलावण करायची गरज नाही. सूर्याला त्याच्या प्रकाशाची जाहिरात नाही करावी लागत. तुम्हाला तुमचा मान आणि आदर पूर्वीपेक्षा हजारपटींनी परत मिळणार. तुमच्या नावात ‘शिव’ आहे. बहुजनांचा आद्य महानायक !
कडकडीत सलाम

-किरण माने

हेही वाचा : अंबानींचं प्री-वेडिंग संपता संपेना…; शाहरुख, सलमानसह रणवीर सिंह पुन्हा पोहोचले जामनगरला, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, किरण मानेंच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘बिग बॉस मराठी’मुळे ते घराघरांत लोकप्रिय झाले. काही महिन्यांआधीच त्यांनी शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश केला होता. सोशल मीडियावर सक्रिय राहून अनेकदा ते सामाजिक व राजकीय विषयांवर त्यांची स्पष्ट मतं मांडत असतात. शेवटचे ते कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत झळकले होते. यामध्ये त्यांनी सिंधुताईंच्या वडिलांची भूमिका निभावली होती. 

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran mane praised karnataka congress leader dk shivakumar sva 00
Show comments