अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे सातत्याने चर्चेत असतात. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत ते व्यक्त होताना दिसतात. आता त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पाच वर्षांपूर्वीची आठवण चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत जेव्हा ते विलास पाटील ही भूमिका साकारत होते, त्यावेळची एक आठवण त्यांनी सांगितली आहे.

एका नावाजलेल्या तेलुगु अभिनेत्यानं…

किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील माझी विलास पाटील ही भूमिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. एक दिवस अचानक माझ्या मोबाइलवर एक मेसेज आला, “तू माझ्यापेक्षा चांगला अभिनय केला आहेस, मी खूप प्रभावित झालो आहे- साक्षी शिवा.”

“साऊथचा एक ग्रेट ॲक्टर साक्षी शिवाचा तो मेसेज होता. एका नावाजलेल्या तेलुगु अभिनेत्यानं माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला दाद दिलीय, यावर माझा विश्वासच बसेना. तो साक्षी शिवाचाच मेसेज आहे याची खात्री झाल्यावर खूप आनंद झाला. काय करू, कुणाला सांगू, काय रिप्लाय देऊ, काही सुचेना झालं. डोळ्यात पाणी आलं.”

पाच वर्षांपूर्वीची ही आठवण, असे म्हणत त्यांनी पुढे लिहिले, “‘मुलगी झाली हो’ ही मालिका आधी तेलुगुमध्ये ‘स्टार मा’वर ‘मौनरागम’ नावाने सुरू झाली होती. साऊथमध्ये लोकप्रियतेचे सगळे उच्चांक त्या मालिकेने तोडले होते. मी साकारत असलेली ‘विलास पाटील’ची भूमिका ‘सिनैय्या’ नावाने तेलुगुमध्ये अभिनेता साक्षी शिवाने साकारली होती. आपण तेलुगुत केलेली भूमिका मराठीत कोण करतंय या कुतूहलानं त्याने आपली मराठी मालिका बघायला सुरुवात केली होती.”

“साऊथ इंडस्ट्री का ग्रेट आहे, यावर बर्‍याचदा चर्चा सुरू असते. कारणं अनेक आहेत, पण तिथल्या अभिनेत्यांना एकमेकांविषयी आदर असणं हा गुण आपल्याला नेहमी दिसतो. साक्षी शिवानं मला मेसेज केला नसता तरी त्याच्या करिअरमध्ये काहीही फरक पडला नसता. पण, तरीही त्याने नितळ मनानं हे कौतुक केलं. आपल्याकडे समोरून काहीतरी फायदा अपेक्षित असल्याशिवाय कौतुक नसतं. अर्थात मराठीमध्ये काही चांगले, दिलदार, प्रतिभावान, कदरदान लोकही आहेत. फक्त त्यांची संख्या आणि ताकद वाढो हीच अपेक्षा”, असे म्हणत साक्षी शिवाच्या मेसेजची आठवण किरण माने यांनी पोस्ट करत सांगितली आहे.

दरम्यान, किरण माने यांची ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील विलास पाटील ही भूमिका मोठ्या प्रमाणात गाजल्याचे पाहायला मिळाले होते. याबरोबरच बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात अभिनेते सहभागी झाले होते.

Story img Loader