‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व दणाणून गाजवणारे किरण माने सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांच्या आयुष्यातील विविध गोष्टी ते चाहत्यांबरोबर शेअर करतात. तसेच आध्यात्मिक बाबी, महापुरुषांविषयीची मतं आणि विविध घटनांवर ते स्पष्ट व परखडपणे आपले विचार मांडतात. किरण मानेंच्या याच स्वभावाचं मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री व दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनी कौतुक केलं होतं. किरण माने यांनी प्रिया यांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करीत त्यांचे आभार मानले आहेत.
किरण माने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रिया बेर्डे यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या एका जुन्या मुलाखतीचा आहे. मुलाखतीमध्ये प्रिया बेर्डे यांनी किरण माने ही कशी व्यक्ती आहे हे सांगितलं होतं. तसेच त्यांच्याविषयी अनेक गोष्टी कानावर आल्या होत्या; मात्र ते तसे नाहीत. ते फार चांगले व्यक्ती आहेत, असं त्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या. तो व्हिडीओ पोस्ट करीत, त्यावर कॅप्शनमध्ये किरण मानेंनी लिहिलं, “आपल्यापेक्षा सीनियर, अनेक वर्षं इंडस्ट्री जवळून बघितलेल्या, एका सुपरस्टारच्या पत्नीनं माझ्याविषयी हे सांगणं खूप बळ देणारं होतं. मुलाखतीत बोलता बोलता अचानक प्रियाताई बेर्डेंनी माझ्याबद्दल जे काही मनापासून सांगितलं, ते ऐकून त्यावेळी मी भारावलो होतो.”
‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेच्या निमित्ताने किरण माने आणि प्रिया बेर्डे यांनी एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यावेळी दोघांनी एकमेकांबरोबर काम करतानाचा अनुभव सांगितला होता. प्रिया बेर्डे फार मोठ्या कलाकार असूनही त्यांच्याबरोबर काम करताना कोणतंही दडपण त्या आम्हाला जाणवू देत नाहीत, असं किरण माने त्या मुलाखतीमध्ये म्हणाले होते. याच मुलाखतीत किरण मानेंबरोबर काम करतानाचा अनुभव सांगताना प्रिया बेर्डेंनी त्यांचं कौतुक केलं होतं.
प्रिया बेर्डे काय म्हणाल्या होत्या?
प्रिया बेर्डे यांनी म्हटलं होतं, “किरण माने खरंच खूप चांगले व्यक्ती आहेत. मी त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं आणि खूप काही वाचलं आहे. आम्ही फेसबुक फ्रेंड आहोत. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या अनेक पोस्ट मी वाचल्या आहेत. त्यात कुठेच चुकीचं असं मला काही जाणवलं नाही.”
“जगामध्ये चांगलं आणि वाईट, असं काही नसतं. प्रत्येकाचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. त्यांनी आता जर काही म्हटलं, तर ते तुम्हाला पटेलच, असं नाही. पण, ते मला पटतं आहे ना, हा माझा दृष्टिकोन आहे त्यांच्याकडे पाहण्याचा. जोपर्यंत एखादी व्यक्ती माझ्यासमोर येत नाही आणि संवाद साधत नाही, तोपर्यंत मी हे ठरवत नाही की, ती व्यक्ती चांगली आहे की वाईट”, असं प्रिया बेर्डेंनी सांगितलं होतं.
सातारी पद्धतीने खेळला…
“बिग बॉसच्या घराताही त्यांचा खेळ मला आवडला होता. त्यांनी अगदी सातारी पद्धतीने हा खेळ खेळला होता. अगदी व्यवस्थित आणि स्वच्छ तितकंच रोखठोक बोलायचे. एकत्र काम करताना कधी त्यांनी काही सल्ले दिले, तर ते मला चांगले वाटतात. त्यामुळे किरण माने स्वभावानं छान व्यक्ती आहेत”, अशा शब्दांत प्रिया बेर्डेंनी किरण मानेंचं कौतुक केलं होतं.