अभिनेते आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी किरण माने नेहमी चर्चेत असतात. अभिनबरोबरचं ते त्यांच्या परखड मतांमुळे आता अधिक चर्चेत येऊ लागले आहेत. नुकतीच त्यांनी पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली होती; ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने किरण माने यांनी पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली होती.
किरण मानेंची पोस्ट वाचा
…एक नाही, दोन नाही, तब्बल ऐंशी दिवस मी तिला पाहिलं नव्हतं, बोललो नव्हतो. लग्नानंतरच्या तेवीस वर्षांत पहिल्यांदाच असं झालं होतं. फॅमिली विकच्या दिवशी ‘बिग बॉस’च्या घरात तिनं पाऊल ठेवलं…तिला पाहिलं आणि मी लहान मुलासारखी रडायला सुरुवात केली. तो क्षण आता पाहताना हसू येतं, लय विनोदी दिसलोय मी…पण त्यावेळी मनाची काय अवस्था झाली होती हे शब्दांत नाही सांगू शकत.
‘बिग बॉस’मध्ये गेल्यावर मला कळलं की, माझ्या आयुष्यात मी किती तिच्यावर अवलंबून आहे. मी स्वत:ला अभिनय क्षेत्रात संपूर्णपणे तन-मन-धनानं झोकून दिलं… तेव्हापासून…घरात लाईटबिल किती येतं? पाणी बिल कोण भरतं? डाळीचा भाव काय आहे? भाजीपाला कधी आणतात? गॅस संपल्यावर कुणाला फोन करायचा असतो? मुलांच्या शाळेतल्या ‘पालक मिटिंग’ कधी असतात? आई-दादांच्या मेडिकल चेकअपच्या तारखा काय आहेत? वरच्या मजल्यावरचे दोन फ्लॅट भाड्याने दिलेले आहेत त्याचं महिन्याला किती भाडं येतं…वगैरे वगैरेपासून ते बेसन लाडू कुठल्या डब्यात आहेत? उकडलेल्या शेंगा कुठं ठेवल्यात? या गोष्टींतलंही मला अजूनही काहीही माहिती नाही. घर सांभाळणं खायचं काम नाय राव. साधी ‘बिग बॉस’च्या घरातली कामं वाटून घेऊन ती करता-करता आमची वाट लागत होती. हे ‘गृहिणी’पद म्हणजे एखाद्या बड्या कंपनीच्या सीईओपेक्षा किंचीत जास्तच मल्टीटास्किंग आहे.
“तुम्ही म्हणालं, काय हा माणूस आहे? मी घरातलं काय बघत नाय, ही काय कौतुकानं सांगायची गोष्ट का? काही जणांना वाटेल किती हाल होत असतील तिचे? पण नाही मित्रांनो. तिनं माझी पॅशन ही तिची पॅशन बनवली आणि नोकरी सोडून स्वखुशीनं हा निर्णय घेतला. मला एका फार मोठ्या जबाबदारीतून ‘रिलॅक्स’ ठेवलं आणि म्हणाली “लढ तू. तुझ्या पॅशनला फॉलो कर. ज्यात तुझा आनंद आहे, ते करत तू मोठा झालेला पाहायचंय मला. घराची काळजी करू नकोस. मी इथे काही कमी पडू देत नाही. तू अभिनयात कुठे कमी पडू नकोस.””
डियर बायको, आज आपल्या सहजीवनाचा रौप्यमहोत्सव. आयुष्यातल्या प्रवासात शुन्यापासून तू सोबत आहेस. एक वेडं स्वप्न उराशी बाळगून महाप्रचंड जिद्दीनं खोल दरीतून ऊत्तुंग शिखराकडे चाललेला मी. माझा हात हातात घेऊन सगळं यशापयश, मानापमान, चढउतार माझ्याबरोबर झेललेस. माझ्याबरोबर अख्ख्या घराला आनंदात, समाधानात ठेवलंस. जे आहे त्यात अपार आनंद शोधत, रसरशीत आयुष्य जगत पुढे चालायला तू शिकवलंस. आत्ता कुठं फक्त पंचवीस वर्ष पूर्ण झाली. अजून लय लांबचा पल्ला गाठायचाय. लय लय लय प्रेम. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
हेही वाचा – विजय मल्ल्याच्या लेकानं ख्रिश्चन पद्धतीनं गर्लफ्रेंडशी केलं लग्न, पहिला फोटो आला समोर
हेही वाचा – Video: “आज मी दारू…”, सोनाक्षी सिन्हाच्या लग्नासाठी पोहोचलेल्या हनी सिंगचं वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, किरण मानेंच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ते एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. याआधी ते ‘कलर्स मराठी’वरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत झळकले होते. सिंधुताईंच्या वडिलांची भूमिका किरण मानेंनी साकारली होती.