बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले आहेत.
महारोजगार मेळाव्याच्या व्यासपीठावर भाषणासाठी शरद पवारांचं आगमन होताच बारामतीकरांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर ‘बिग बॉस’ अभिनेते व शिवसेना ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. जनतेचं हे प्रेम प्रत्येकाच्या नशिबात येत नाही असं म्हणत किरण मानेंनी या पोस्टमध्ये शरद पवारांचं कौतुक केलं आहे.
शरद पवारांचा महारोजगार मेळाव्यातील व्हिडीओ शेअर करत किरण माने लिहितात, “आपल्या हद्दीत येऊन पोकळ माज करू पाहणार्या शत्रूच्या छावणीत घुसून त्याचा धुव्वा कसा उडवायचा… ही जिगरबाज वृत्ती पवारसाहेबांकडूनच शिकावी! पवारांच्या वयात, या स्टेजवर बसलेल्या गावगुंडांची काय दयनीय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी. साहेबांना पाहून जनतेने उत्स्फूर्तपणे केलेला जल्लोष प्रत्येकाच्या नशिबात नाही येत. साहेबांच्या सभेत यातल्या एकानेही अशी अचानक स्टेजवर जायची हिंमत करावी. ‘जरांगेंनी दिलेल्या शिव्या बर्या होत्या’ असं म्हणायची वेळ येईल.”
हेही वाचा : धक्कादायक! देवोलीनाच्या मित्राची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या, पंतप्रधान मोदींकडे केली मदतीची मागणी
“ही ‘चाल’ पावसातल्या सभेपेक्षा शंभरपट खतरनाक परिणाम करणार आहे यावेळी! बख्खळ आले आन् मायंदाळ गेले गड्याहो…पवारसाहेब हा महाराष्ट्राच्या जनतेच्या काळजातला विषय हाय…थंड घ्या.” असं किरण मानेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, या महारोजगार मेळाव्यात ५५ हजार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये साडेतीनशेहून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला होता.