Kiran Mane : सोशल मीडियामुळे गेल्या दोन-तीन वर्षांत प्रसिद्धी झोतात आलेले कलाकार म्हणजे सूरज चव्हाण आणि गौतमी पाटील. सुरुवातीच्या काळात त्यांना काही प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सूरजला त्याच्या सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे अनेकांनी ट्रोल केले होते, तर गौतमी पाटीलही तिच्या डान्समुळे टीकेची धनी झाली होती. पण आता दोघांनी त्यांच्या मेहनतीने मनोरंजन क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

‘बिग बॉस मराठी’सारख्या शोमध्ये सूरजला पहिल्यानंतर अनेकांनी नापसंती दर्शवली होती. पण शोमधील आपल्या वागणुकीने त्याने सर्वांचीच मनं जिंकली. यानंतर आता त्याचा ‘झापुक झुपूक’ चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर गौतमीदेखील स्टार प्रवाहवरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. गौतमी आणि सूरज यांच्या याच प्रवासाबद्दल एका मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. हे अभिनेते म्हणजे किरण माने.

किरण माने हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांची अनेक राजकीय व सामाजिक मतं शेअर करत असतात. अशातच त्यांनी गौतमी व सूरजबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “उच्चभ्रूंनी हेटाळणी केलेल्या गौतमी पाटीलला नंबर वन चॅनेलच्या रिॲलिटी शो मध्ये घ्यावं लागतं. आणि ज्या सुरज चव्हाणवर ‘ते’ हसले, त्याचा सिनेमा येतोय म्हणून प्रेक्षकांवर लादलेल्या ‘सो कॉल्ड’ सुपरस्टार्सना त्यांचे सिनेमे पुढे ढकलावे लागतात. ही सांस्कृतिक वर्चस्ववादाला सर्वसामान्य प्रेक्षकांनी दिलेली सणसणीत मुस्काडात आहे.”

किरण माने यांची फेसबुक पोस्ट

आधी टीका झालेल्या सूरज चव्हाण आणि गौतमी पाटील या दोन कलाकारांची आज सिनेइंडस्ट्रीत चांगलीच हवा पाहायला पाहायला मिळत आहे. दोघेही वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यावर आता किरण माने यांनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांच्या या पोस्टवर काहींनी टीकाही केली आहे. तर काहींनी त्यांच्या पोस्टला समर्थनही दिलं आहे.

सूरजबद्दल बोलायचं झालं तर ‘बिग बॉस’मुळे तो प्रसिद्धी झोतात आला आणि आता तर त्याचा झापुक झुपूक चित्रपट येत आहे, ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यावर काही टीका करत आहेत. पण अनेकजण सूरजला पाठींबाही देताना दिसत आहेत. तर स्टेज शो करणाऱ्या गौतमीच्या डान्सवर आधी अनेकांनी टीका केली. पण नंतर आपली चूक कबूल करत तिने सगळ्यांच्या मनावर छाप उमटवली. त्यानंतर ती अनेक वाहिन्यांमधून कलाकारांबरोबर स्टेज शेअर करत आहे.