‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या पर्वात अभिनेत्री जान्हवी किल्लेकर(Jahnavi Killekar)ने टास्क क्वीन अशी स्वत:ची ओळख निर्माण केली. या शोमुळे अभिनेत्री मोठ्या चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉस मराठी शो नंतरही अभिनेत्री विविध कार्यक्रमांच्या निमित्तानेदेखील चर्चेत राहिली. सोशल मीडियावरही जान्हवी किल्लेकर(Jahnavi Killekar) सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिच्या रील्सना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत असल्याचे दिसते. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील ‘अबोली’ मालिकेत इन्स्पेक्टरची भूमिका साकारताना दिसत आहे. इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटील असे तिच्या भूमिकेचे नाव आहे. या भूमिकेतून अभिनेत्री पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आता मात्र, जान्हवी तिच्या मालिकेतील भूमिकेमुळे नाही, तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

जान्हवी किल्लेकर काय म्हणाली?

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने एका मुलाखतीत तिचा महिन्याचा खर्च किती असतो, तसेच ती त्वचेची काळजी घेण्यासाठी काय करते, याबद्दल वक्तव्य केले आहे. नुकतीच अभिनेत्रीने ‘सुमन म्युझिक मराठी’ला मुलाखत दिली. स्कीन केअर रूटिनविषयी बोलताना जान्हवीने म्हटले, “मी त्वचेसाठी काहीच करत नाही. फेसवॉश लावते. मी मॉइश्चरायजरसुद्धा फार कमी लावते. शूटिंग झाल्यानंतर घरी येऊन मी मेकअप काढते. बेबी ऑइलने टिश्यूचा वापर करून मी चेहरा पुसते. याशिवाय बाकी मी काहीच करत नाही.”

या मुलाखतीत तिला विचारले की, तिचा महिन्याचा खर्च किती होतो? यावर बोलताना जान्हवी किल्लेकरने म्हटले, “अजून एक गोष्ट मी सकाळी करते, जी मी चेहऱ्याला लावत नाही. पण, ग्लूटाथिओन (glutathione)चे मी दररोज सेवन करते. निरोगी त्वचेसाठी किंवा चेहऱ्यावर तेज येण्यासाठी ग्लूटाथिओनचे सेवन करते. बाकी मी चेहऱ्याला काही लावत नाही. पण, त्या ग्लूटाथिओनचाच खर्च जास्त आहे. जवळजवळ ३०-३५ हजार महिन्याचा त्वचेसाठी खर्च होतो”, असे अभिनेत्रीने म्हटले.

‘अबोली’ या मालिकेतील भूमिकेविषयी बोलताना जान्हवी किल्लेकरने म्हटले की, “आता सध्या जी मी भूमिका करत आहे ती खूप क्रूर आहे, लाचखोऱ इन्स्पेक्टर आहे, त्यामुळे ते करताना मला खूप मजा येतेय. सगळ्यांवर अरेरावी करणं, जी मी खऱ्या आयुष्यात करू शकत नाही, ती मी या मालिकेच्या माध्यमातून करतेय”, असे म्हणत अभिनेत्रीने ही भूमिका करताना आनंद मिळत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, जान्हवी किल्लेकरने याआधी ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले.

Story img Loader