Kokan Hearted Girl Aka Ankita Walwalkar : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे अंकिता वालावलकर घराघरांत लोकप्रिय झाली. या शोमुळे ‘कोकण हार्टेड गर्ल’ला ‘महाराष्ट्र हार्टेड गर्ल’ अशी नवीन ओळख मिळाली. महाअंतिम सोहळा संपल्यावर अंकिताने ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता सध्या वालावलकरांच्या घरी लेकीची लगीनघाई सुरू असून अंकिता व कुणाल यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे.
अंकिता व कुणाल यांचा साखरपुडा १४ फेब्रुवारीला घरगुती पद्धतीने पार पडला. या दोघांनी साखरपुड्यात पारंपरिक मराठमोळा लूक केल्याचं पाहायला मिळालं. सध्या बरेच सोशल इन्फ्लुएन्सर्स व सेलिब्रिटी अंकिताच्या लग्नासाठी कोकणात पोहोचले आहेत. ‘कोकण हार्टेड गर्ल’चा विवाहसोहळा देवबाग येथे पार पडणार आहे. याठिकाणीच अंकिताचं घर देखील आहे. मात्र, त्याआधी अंकिताने एक बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे. साखरपुडा झाल्यावर रात्री प्रवास करत असताना अंकिताच्या गाडीचा अपघात झाला आहे.
कारचा आरसा फुटल्याचा व्हिडीओ अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. तसेच यामध्ये गाडी खालच्या बाजूने देखील थोडी घासली गेल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, सुदैवाने अंकिता व तिच्या कुटुंबीयांना यात कोणतीही दुखापत झालेली नाही. ते सुखरुप आहेत. अंकिताने अपघात झाल्याचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये, “आम्ही सगळे सुखरुप आहोत पण, खरंच नजर लागते” असं लिहिलं आहे. तसेच या स्टोरीला अंकिताने “नजर काढ देवा…” असं गाणं लावलं आहे.
१६ फेब्रुवारीला अंकिता व कुणाल विवाहबंधनात अडकणार आहेत. लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी डीपी दादा म्हणजे धनंजय पोवार सुद्धा पोहोचले आहे. याशिवाय अंकिताचे कुटुंबीय, जवळचे मित्र-मैत्रिणी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच कलाविश्वातील काही सेलिब्रिटी सुद्धा या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं, तर कुणाल भगत हा मराठी संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘येक नंबर’ या सिनेमाची संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय ‘झी मराठी’च्या अनेक मालिकांच्या शीर्षक गीतांना देखील कुणालने संगीतबद्ध केलं आहे.