‘बिग बॉस मराठी ५’ फेम लोकप्रिय युट्यूबर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर लवकरच लग्न करणार आहे. ती मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधणार आहे. सध्या कुणाल व अंकिता त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहे. दोघेही लग्नासाठी शॉपिंग करताना दिसत आहेत. अशातच एका इन्स्टाग्राम व्हिडीओत अंकितासाठी मुंडावळ्या बनवल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर कमेंट करत अंकिताने उत्तर दिलं आहे.
बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व संपल्यापासून अंकिता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती प्रेमात असून लवकरच लग्न करणार असल्याचं तिने शोमध्ये अनेकदा सांगितलं होतं. त्यानंतर तिने १२ ऑक्टोबरला कुणाल भगतबरोबरचे फोटो पोस्ट करून प्रेमाची कबुली दिली. अंकिता कोकणात लग्न करणार आहे. ती व कुणाल दोघेही सध्या लग्नाची तयारी करत आहेत.
हेही वाचा – भाजपा खासदार तेजस्वी सूर्या लोकप्रिय गायिकेशी बांधणार लग्नगाठ? कोण आहे ती? पंतप्रधान मोदींनी केलेलं कौतुक
किर्ती आर्ट अँड क्राफ्ट नावाच्या एका इन्स्टाग्रामवर पेजवर मुंडावळ्यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. ‘कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरच्या लग्नासाठी स्पेशल कस्टमाइझ्ड युनिक आणि नाजूक अशा मुंडावळ्या,’ असा मजकूर या व्हिडीओवर लिहिला होता. तसेच अंकिताला टॅग करा असंही लिहिलं होतं. त्यानंतर अनेकांनी अंकिताला कमेंट्समध्ये टॅग केलं. या पोस्टवर अंकिताने कमेंट करत तिने या मुंडावळ्या घेतलेल्या नाहीत, असं स्पष्ट केलं.
हेही वाचा – ९ वर्षे रखडला, ८ कलाकारांनी नाकारला अन् नंतर ब्लॉकबस्टर ठरला; तुम्ही पाहिलाय का ‘हा’ चित्रपट?
अंकिता प्रभू वालावलकरची कमेंट नेमकी काय?
“मी फक्त एवढंच सांगेन की छान बिझनेस करा, पण खोटं बोलून करू नका. मला खोटं बोलून, माझं नाव वापरून बिझनेस केलेला मला आवडणार नाही. मी तुमच्याकडून मुंडावळ्या घेतलेल्या नाहीत. जे आमच्या लग्नासाठी खरंच मेहनत करत आहेत, त्यांना क्रेडिट मिळू द्या,” अशी कमेंट या पोस्टवर अंकिताने केली आहे.
कुणाल भगत काय करतो?
कुणाल भगत हा प्रसिद्ध मराठी संगीत दिग्दर्शक आहे. तो गायक व लेखकही आहे. अंकितानेही एकदा बिग बॉसच्या घरात तो संगीत दिग्दर्शक असल्याचं म्हटलं होतं. कुणालने अनेक मराठी चित्रपट व मालिकांसाठी संगीत दिग्दर्शनाचं काम केलं आहे. कुणाल करण सावंतबरोबर मिळून काम करतो. “तू चाल पुढं” या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी कुणाल-करणला अवॉर्डही मिळाला होता.
कुणाल हा कोकणातला आहे. अंकिता आणि कुणाल दोघेही एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. दोघांनी ‘आनंदवारी’ या गाण्यात एकत्र काम केलं होतं. त्यांचं हे गाणं चांगलंच गाजलं होतं.