Kokan Hearted Girl Ankita Walawalkar : ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नसोहळ्यामुळे चर्चेत आहे. कोकणातील कुडाळ येथील लक्ष्मी-नारायण मंदिरात पारंपरिक पद्धतीने अंकिताचा विवाहसोहळा १६ फेब्रुवारीला पार पडला. तिच्या लग्नसोहळ्याला अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, मराठी कलाकार, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचे काही निवडक सदस्य उपस्थित होते. अंकिताच्या लग्नसोहळ्यातील व्हिडीओ व फोटोंनी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिच्या लग्नाचं ठिकाण सुद्धा सर्वांना आवडलं. अशातच ‘कोकण हार्टेड गर्ल’ने शेअर केलेला आणखी एक व्हिडीओ आता सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.

अंकिता थाटामाटात लग्न झाल्यावर पती कुणालसह आपल्या सासरी म्हणजेच माणगावला गेली आहे. याठिकाणी या जोडप्याचं मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलं. अंकिताच्या स्वागतासाठी तिच्या सासरच्यांनी खास तयारी केली होती. ‘कोकण हार्टेड गर्ल’साठी सर्वत्र फुलांची सजावट करण्यात आली होती. सुरुवातीला नवीन जोडप्याची भगत कुटुंबीयांनी नजर काढली, यानंतर अंकिताचं औक्षण करण्यात आलं.

पुढे, अंकिताने उखाणा घेत माप ओलांडून गृहप्रवेश केला. यावेळी तिने सुंदर अशी लाल रंगाची साडी नेसून त्यावर गुलाबी शाल घेतली होती. डोक्याला मुंडावळ्या, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, गळ्यात मंगळसूत्र या लूकमध्ये ही नवी नवरी अंकिता अतिशय सुंदर दिसत होती. तिचं कुणालच्या घरच्यांनी मोठ्या प्रेमाने स्वागत केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

यानंतर काही लहान मुलांनी या जोडप्याजवळ घोळका करून अंकितासह फोटो काढल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला तिने “माणगावच्या घरी गृहप्रवेश” असं कॅप्शन दिलं आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अवघ्या काही वेळातच लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी, “होळीला नक्की गावी ये…” अशी सुद्धा विनंती अंकिताला कमेंट्समध्ये केली आहे.

दरम्यान, अंकिता व कुणालने १६ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. लवकरच ‘कोकण हार्टेड गर्ल’ तिच्या लग्नाचं खास गाणं सर्वांबरोबर शेअर करणार आहे. यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. हे गाणं कुणालने लिहून संगीतबद्ध केलं आहे.

Story img Loader