Ankita Walawalkar : अंकिता वालावलकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर आल्यावर अंकिताने ती फेब्रुवारी महिन्यात लग्नबंधनात अडकणार असं आधीच स्पष्ट केलं होतं. यानुसार आता येत्या काही दिवसांत प्रेक्षकांची लाडकी ही ‘कोकण हार्टेड गर्ल’ विवाहबंधनात अडकणार आहे. अंकिताच्या घरी आता लगीनघाईला सुरुवात झालेली आहे.
अंकिता गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका सर्वांना देत होती. याशिवाय अनेक शूट्समध्ये सुद्धा ती व्यग्र होती. आता लग्नासाठी अवघे चार दिवस बाकी राहिलेले असताना ‘कोकण हार्टेड गर्ल’ मुंबईतली सर्व कामं आटोपून आपल्या गावी परतली आहे. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अंकिताने या व्हिडीओला ‘लगीनघाई सुरू’ असं कॅप्शन दिलं आहे.
अंकिता या व्हिडीओमध्ये मुंबई ते गोवा असा विमानप्रवास करून त्यानंतर देवबाग येथे पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. गावी पोहोचताच तिचं खास स्वागत करण्यात आलं. अंकिता म्हणाली, “सगळं शूट आटोपून मी आज घरी जाण्यासाठी निघतेय. आता घरी गेल्यावर लग्नाची खरी तयारी सुरू होणार आहे. मुंबई ते गोवा विमानप्रवास केला. त्यानंतर मी कारने घरी गेले. याठिकाणी कुटुंबाकडून एक गोड सरप्राइज मिळालं. हे गोड सरप्राइज सर्वांनाच आवडेल.”
अंकिताला समोर बसवून तिच्यासाठी ‘नवराई’ असं लिहिलेली रांगोळी काढण्यात आली होती. अंकिताच्या आईने तिचं औक्षण केलं. यानंतर सगळ्या कुटुंबीयांनी मिळून अंकितासाठी “अभी ना जाओ छोड कर, कि दिल अभी भरा नहीं” या सुंदर गाण्यावर डान्स केला. कुटुंबीयांकडून मिळालेलं हे सुंदर सरप्राइज पाहून अंकिता भारावून गेली होती.
‘कोकण हार्टेड गर्ल’ने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. दरम्यान, अंकिताच्या लग्नासाठी कलाविश्वातील तिचे अनेक जवळचे मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत.
अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं, तर कुणाल भगत मराठी सिनेविश्वात सक्रिय आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘येक नंबर’ चित्रपटासाठी त्याने संगीत दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. याशिवाय ‘झी मराठी’ची मालिका ‘लक्ष्मी निवास’, आगामी मालिका ‘तुला जपणार आहे’ यांनाही कुणालने संगीत दिलेलं आहे. कुणाल-करण अशी या संगीतकारांची जोडी असून, या दोघांनी मिळून अनेक प्रोजेक्ट्ससाठी काम केलेलं आहे.