टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. मात्र, रिअॅलिटी शोचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग असल्याचे पाहायला मिळते. विविध विषयांवर आधारित रिअॅलिटी शो विविध चॅनेल्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता असाच एक आगळावेळा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ असे या कार्यक्रमाचे नाव असून, सोनी मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. महाराष्ट्रात थोर आणि महान संतांनी जन्म घेतला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर होत असलेल्या भक्तिरसपूर्ण, कथारूप, एकपात्री निवेदनाला कीर्तन, असं म्हणतात आणि हे करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार म्हणून ओळखले जाते. आपल्या महाराष्ट्राला कीर्तनाची वैभवशाली परंपरा लाभली आहे आणि असेच हजारो कीर्तनकार महाराष्ट्रात कीर्तन परंपरा जपण्यासाठी कीर्तन शिकत आहेत. महाराष्ट्रात वर्षानुवर्षं कीर्तन परंपरा सुरू आहे. आता या कीर्तनकारांना महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसमोर त्यांची कला सादर करण्याची संधी ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ याद्वारे मिळणार आहे.
या शोमध्ये कोण सहभागी होऊ शकते?
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार?’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ‘सोनी लिव्ह’वर ७ फेब्रुवारीपासून २७ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. १२ वर्षं आणि त्यापेक्षा अधिक वय असलेला प्रत्येक स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो.
नोंदणी कशी कराल?
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सगळ्यात आधी सोनी लिव्ह अॅप डाउनलोड करा. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’च्या पेजवर जाऊन रजिस्ट्रेशन करा. आवश्यक ती माहिती भरा आणि नियम व अटी मान्य करू पुढे जा. तुमच्या कीर्तनाचा १ ते २ मिनिटांचा ऑडिशन व्हिडीओ अपलोड करा आणि आपलेऑडिशन पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करा.
दरम्यान, ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा रिअॅलिटी शो कीर्तनकारांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. या माध्यमातून प्रेक्षकांना छोट्या-मोठ्या विविध कीर्तनकारांची कीर्तने ऐकायला मिळणार आहेत.