Kon Hotis Tu Kay Zalis Tu Star Pravah New Serial : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाजलेल्या मालिकेत गिरीजाने ‘गौरी’ ही भूमिका साकारली होती. आता अवघ्या काही महिन्यांतच प्रेक्षकांची लाडकी गौरी… ‘कावेरी’ होऊन सर्वांच्या भेटीला येणार आहे.
‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेत गिरीजा प्रभूसह वैभव मांगले, अमीत खेडेकर, अमृता माळवदकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असतील हे पहिल्या प्रोमोतून स्पष्ट झालं आहे. मात्र, अद्याप या मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट प्रेक्षकांसमोर आलेली नाही. त्यामुळे मालिकेचा नायक कोण असेल, नव्या मालिकेत आणखी कोणते कलाकार झळकणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीने नुकताच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पोस्टवर एक ब्लर फोटो शेअर करत, “स्टार प्रवाह’ परिवारात तसेच ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या नव्या मालिकेत एक नवीन अभिनेत्री सामील होणार आहे” अशी हिंट प्रेक्षकांना दिली आहे. याच्या कॅप्शनमध्ये खाली ओळखा पाहू कोण? कमेंट करून सांगा असं लिहिण्यात आलं आहे. यावरून नेटकऱ्यांनी या अभिनेत्री नेमक्या कोण आहेत याचा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे.
या पोस्टच्या कमेंट्समध्ये बहुतांश प्रेक्षकांनी फोटोत ब्लरमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी आहेत असा अंदाज बांधला आहेत. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाल्यावर या अभिनेत्री नेमक्या कोण आहे याची अधिकृत माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. याशिवाय मालिकेत गिरीजाबरोबर प्रमुख भूमिका कोणता नायक मुख्य भूमिका साकारणार हे जाणून घेण्यासाठीही सगळेजण उत्सुक आहेत.

दरम्यान, या नव्या मालिकेत कावेरीच्या वडिलांची म्हणजेच मुकुंद सावंत ही भूमिका प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले साकारणार आहेत. गिरीजा आणि वैभव मांगले यांच्यातील प्रेमळ मालवणी संवाद पहिल्याच प्रोमोमध्ये प्रेक्षकांना ऐकायला मिळाले आहेत.