Kon Hotis Tu Kay Zalis Tu New Serial : सध्या गिरीजा प्रभूच्या पुनरागमनाची जोरदार चर्चा चालू आहे. ‘स्टार प्रवाह’च्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेतून अभिनेत्री अवघ्या तीन महिन्यांतच छोट्या पडद्यावर परतणार आहे. यापूर्वी ‘स्टार प्रवाह’ची सुपरहिट मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये तिने गौरी हे पात्र साकारलं होतं.

‘स्टार प्रवाह’वर लवकरच भेटीला येणाऱ्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कोकणातील नयनरम्य दृष्य आणि सरसर नारळाच्या झाडावर चढणारी ‘कावेरी’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने पुरस्कार सोहळ्यादरम्यान या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला.

या नव्या मालिकेत कावेरीच्या वडिलांची म्हणजेच मुकुंद सावंत ही भूमिका साकारणार आहे सुप्रसिद्ध अभिनेता वैभव मांगले. गिरीजा आणि वैभव मांगले यांच्यातील प्रेमळ मालवणी संवाद पहिल्याच प्रोमोमध्ये प्रेक्षकांना ऐकायला मिळाले आहेत.

या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना वैभव मांगले म्हणाले, “मी ‘स्टार प्रवाह’बरोबर पहिल्यांदाच काम करतोय त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेची गोष्ट कोकणात घडते. कोकणावर माझं विशेष प्रेम आहे. मालिकेचं बरचसं शूटिंग कोकणात होणार आहे. कोकणातली माणसं आणि त्यांच्या भाषेत एक वेगळा गोडवा आहे. मला वाटतं कोणतीही प्रांतिक गोष्ट करताना त्या भागातल्या भाषेचे लहेजा जपायला हवा. मालिकेच्या प्रोमोमधून याची झलक पाहायला मिळतेय. मुकुंद सावंत ही व्यक्तिरेखा मी साकारत आहे.”

“मुकुंदचं त्याच्या मुलीवर म्हणजेच कावेरीवर प्रचंड प्रेम आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर मुलीचं संगोपन करण्यासाठी त्याने बरेच कष्ट घेतले. कावेरीला त्याने आपल्या हक्कांसाठी लढायला शिकवलं आहे. ज्या संस्कृतीमध्ये आपण वाढलो त्याची कधी पाठी सोडू नये अशा विचारांचा मुकुंद आहे. नातेसंबंधांची खूप छान गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळेल.”

दरम्यान, गिरीजा प्रभू, वैभव मांगले यांच्यासह अमीत खेडेकर आणि अमृता माळवदकर यांची झलक प्रेक्षकांना ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. आता ही नवीन मालिका केव्हा सुरू होणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader