प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांची भाची व कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंहदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आरतीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. आरतीच्या हाताला दुखापत झाली आहे. आरतीने सोशल मीडियावर रुग्णालयातील एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली.
ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आरती २३ एप्रिलला मित्रमैत्रिणींबरोबर डिनरसाठी रेस्टॉरंटमध्ये गेली होती. “जेवताना माझ्या हातून काचेचा ग्लास फुटला. काचेचे काही तुकडे हातात गेले हे माझ्या लक्षात आलं नाही. मला रात्रभर वेदना होत होत्या. सकाळी मी डॉक्टरकडे गेल्यावर हातात सात काचेचे तुकडे गेल्याचं त्यांनी सांगितलं. हातात गेलेले काचेचे तुकडे काढल्यानंतर मला सहा टाके घालावे लागले,” असं आरतीने सांगितलं.
आरतीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन रुग्णालयातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आरती तिची मालिका टीव्हीवर बघताना दिसत आहे. “हा आठवडा फार कठीण होता. काचेचे तुकडे हातात गेल्यामुळे या काळात माझ्यावर एक सर्जरी झाली. माझ्या मालिकेचं लाँचिंग रुग्णालयात झालं. मी भाग्यवान आहे की यापेक्षा मोठं काही झालं नाही. गुरुजींनी मला वाचवलं, एवढंच मला माहीत आहे. सगळ्यांनी माझी खूप काळजी घेतली. आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. काम सुरू केलं आणि मी रुग्णालयात पोहोचले. पण मी वाघीण आहे. लवकरच कामावर परतेन,” असं आरतीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>> पाणावलेले डोळे, भांगेत कुंकू अन्…; ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील सीतामातेबद्दलची ‘ती’ चूक सुधारली
उपचारानंतर आरतीला रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. आरतीने तिच्या ‘श्रवणी’ या मालिकेच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे. या मालिकेत ती नकारात्मक भूमिका साकारत आहे.