अभिनेता गौरव सरीनने लग्नगाठ बांधली आहे. त्याने ८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या जया अरोराशी लग्न केलं. दोघांचा लग्नसोहळा दिल्लीत मोठ्या थाटामाटात पार पडला. “तिला नववधूच्या रुपात पाहून मी भावुक झालो होतो, आताही लग्नाबद्दल बोलताना माझ्या अंगावर शहारे येतात. तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पाहून अशी भावना येत असेल तर त्याहून सुंदर जगात काहीच नाही, “असं म्हणत गौरवने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौरव व जया एकमेकांना मागील १५ वर्षांपासून ओळखतात. त्या दोघांच्या कुटुंबियांची मैत्री आहे. हे दोघे अडीच वर्षांपूर्वी प्रेमात पडले. जयाच्या प्रेमात पडण्याबद्दल २९ वर्षीय गौरव म्हणाला, “प्रेमाला कोणतंही कारण लागत नाही, ते आपोआप होतं. माझ्या बाबतीतही तेच घडलं. मी मागील काही वर्षांत खूप जणींना भेटलो, पण जयाबद्दल ज्या भावना होत्या त्या मला कुणाबद्दल वाटल्या नाही. मला जयाबरोबर खूप कम्फर्टेबल वाटतं.”

इंडस्ट्रीबाहेरच्या जोडीदाराशी लग्न केल्याने आयुष्यात समतोल राहील, असं गौरवला वाटतं. “वेगळ्या प्रोफेशनमधील जोडीदार मिळाल्याने तुम्हाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या आधार मिळतो. जेव्हा दोघेही एकाच प्रोफेशनमध्ये असतात तेव्हा त्यांचे वैयक्तिक आयुष्य कामामुळे मागे पडते. एक अभिनेता म्हणून मला घरात भावनिक स्थैर्य हवे आहे आणि जया मला ते देते,” असं गौरव म्हणाला.

गावी आहेत गौरव व जया

गौरव व जया सध्या त्याच्या मूळ गावी, अमृतसरमध्ये कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहेत. “सध्या आम्हाला हे १०-१५ दिवस माझ्या आई-वडिलांबरोबर घालवायचे आहेत. जया या महिन्याच्या अखेरीस अमेरिकेला परत जाणार आहे, मात्र नेमकी तारीख ठरलेली नाही. हनिमूनबद्दल अद्याप काही ठरवलेलं नाही. पण आम्ही आता आयुष्यभर एकमेकांबरोबर प्रवास करणार आहोत,” असं गौरव म्हणाला.

भारत-अमेरिका प्रवासाबद्दल गौरव म्हणाला…

जया अमेरिकेतमध्ये स्थायिक असल्याने हे दोघेही अमेरिका व भारत असा प्रवास एकमेकांसाठी करत राहणार आहेत. “जेव्हा मी शूटिंग करत असेल तेव्हा जया भारतात येईल आणि जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी तिच्याबरोबर राहायला अमेरिकेला जाईल. आम्ही आधीच अडीच वर्षांपासून एकमेकांना भेटणं असंच मॅनेज करतोय, त्यामुळे सवय झाली आहे,” असं गौरव म्हणाला.

‘कृष्णा चली लंडन’मध्ये राधे शुक्लाचे पात्र साकारून गौरवला लोकप्रियता मिळाली. गौरवने चित्रपटांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी टेलिव्हिजनमधून ब्रेक घेतला आहे. “गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या माझ्या दशमी चित्रपटानंतर मी दुसऱ्या प्रोजेक्टचे शूटिंग पूर्ण केले. यात अरबाज खान माझ्या वडिलांच्या भूमिकेत आहे,” असं गौरव म्हणाला.