अभिनेत्री आरती सिंहने लग्न केलं आहे. ३९ वर्षांची आरती गुरुवारी (२५ एप्रिल रोजी) मुंबईतील इस्कॉन मंदिरात दिपक चौहानबरोबर लग्नबंधनात अडकली. आरतीच्या लग्नाला तिचा मामा व सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा उपस्थित राहिला. मामा लग्नात येईल की नाही, अशी शंका असताना त्याने येऊन या नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिल्याने आरतीच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
आरती सिंह ही कृष्णा अभिषेकची बहीण आहे. कृष्णा व गोविंदा या मामा भाच्याचा काही वर्षांपूर्वी वाद झाला होता, त्यानंतर ते एकमेकांशी बोलणं व समोरासमोर येणंही टाळतात. त्यामुळे आता आरतीच्या लग्नाला तो येणार की नाही अशी चर्चा होती. गोविंदा लग्नाला आल्यास मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेईन असं कृष्णाची पत्नी कश्मिरा म्हणाली होती. आता बहिणीच्या लग्नात मामा आल्यावर कृष्णाने प्रतिक्रिया दिली आहे.
Video: मामा-भाच्याचं वैर, पण भाचीच्या लग्नाला पोहोचला गोविंदा; आरती सिंहबद्दल म्हणाला…
“आमच्यासाठी, आरतीसाठी व संपूर्ण कुटुंबासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. सगळे खूप खूश आहेत मामा आले त्या गोष्टीचा खूप आनंद झाला, त्यांना बघून खूप चांगलं वाटलं. आमचे भावनिक बंध आहेत एकमेकांशी त्यामुळे ते आल्याने खूप छान वाटलं,” असं कृष्णा इन्स्टंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
Video: गोविंदाची भाची झाली चौहानांनी सून, आरती सिंहच्या लग्नाला कलाकारांची मांदियाळी, पाहा व्हिडीओ
कृष्णा अभिषेक व गोविंदा यांचा वाद नेमका काय?
काही वर्षांपूर्वी कृष्णानं एका मुलाखतीत “माझ्या मामाने मला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कुठलीही मदत केली नाही. स्वत: संघर्ष करुन मी माझं स्थान निर्माण केलं आहे,” असं म्हटलं होतं. मात्र त्याचं हे वक्तव्य गोविंदाला आवडलं नव्हतं. “लोक केलेले उपकार इतक्या लवकर विसरतात” असं म्हणत त्याने कृष्णाला प्रत्युत्तर दिलं. तेव्हापासून अनेकदा दोघांमध्ये शाब्दिक वाद रंगले व त्यांनी एकमेकांशी बोलण सोडलं. याचदरम्यान, कृष्णाची पत्नी कश्मिराने वादग्रस्त विधान गोविंदाबद्दल केलं होतं.
२०१८ मध्ये गोविंदाने एका शोच्या निर्मात्यांवर पैसे न दिल्याचा आरोप केला होता. यावर “लोक पैशांसाठी कुठेही नाचतात” असं ट्वीट कश्मिराने केलं होतं. तेव्हापासून आजतागात गोविंदा आणि कृष्णा एकमेकांशी बोलताना दिसले नाहीत, असं असूनही आरतीच्या लग्नाला गोविंदा व त्याचा मुलगा यश गेले.