अभिनेत्री क्षिती जोग(Kshitee Jog) सध्या निर्माती म्हणूनदेखील काम करताना दिसत आहे. नुकतीच ती ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हा चित्रपट कुटुंब, बहीण-भावांवर आधारित आहे. क्षिती नाटक, चित्रपट व मालिका या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत क्षिती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. आता मालिकेतून तिने का ब्रेक घेतला यावर एका मुलाखतीत क्षितीने भाष्य केले आहे.
काय म्हणाली क्षिती जोग?
क्षितीने काही दिवसांपूर्वीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत क्षितीने म्हटले, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत मी साडे आठ वर्षे काम केलं. मी ते सतत करत होते. मग ‘झिम्मा’ करायचं आम्ही ठरवलं. मला अत्यंत अभिमान आहे की मी इतका वर्षे टीव्हीमध्ये काम केलं आहे. मला वाटतं की, टीव्हीमध्ये काम करणं कलाकारासाठी अवघड जॉब आहे. सातत्याने त्या माध्यमात काम करायला एक प्रकारचं समर्पण लागतं, जे बऱ्याच नटांमध्ये आहे. मला माहीत नाही की उगाचच लोक त्याला कमी का लेखतात. त्या दरम्यान माझ्या असं लक्षात आलं की, मी जरा आता पाट्या टाकते. माझं थोडं लक्ष नाहीये. मी एकपाठी आहे, मग सीन आला की तो वाचायचा, मग तयार आहे असं सांगायचं. मला नंतर जाणीव व्हायला लागली की आपलं काहीतरी खूप चुकतंय.
“आपल्याला कंटाळा आलाय, कामात एकसारखेपणा आलाय. ज्या गोष्टींचे आपण पैसे घेतो, त्यामध्ये आपण पाट्या टाकू शकत नाही. हे सर्व बाजूंनी चुकीचे आहे. माझं अर्ध मन झिम्मामध्ये अडकलं आहे, हे माझ्या मालिकेच्या टीमची समस्या नाहीये. तर मला ते थोडं व्हायला लागलं. मला वाटलं की बहुतेक मला रोजच्या शूटिंगमधून ब्रेकची गरज आहे आणि माझे निर्माते-दिग्दर्शक ते खूप प्रेमळ आहेत. मी त्यांना म्हटलं की, सर मला ते करायचंय, माझं मन आता तिथे जास्त रमतंय; तर ते अत्यंत प्रेमाने म्हणाले की तू ते कर. त्यानंतर त्यांनी कीपहिलं प्रॉडक्शन वैगेरे कसं चालंलय हे विचारलं. पण, म्हणून मी तो ब्रेक घेतला. आता मला कधी कधी त्याची आठवण येते. ते जे मालिकेचे एक रूटिन असतं ना ते आवडायचं. मला त्याची आठवण येते. पण, बरं झालं मी तो ब्रेक घेतला.”
दरम्यान, क्षिती जोगची ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. आता क्षिती नवनवीन चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिच्या भूमिका प्रेक्षकांना आवडत असल्याचे पहायला मिळते.