बालपण हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा काळ असतो. लहान मुलं अगदी निरागस असतात. त्यांना चांगलं-वाईट काही समजत नाही. या वयात त्यांच्यावर जे संस्कार होतात, त्यानुसार मुलं वागतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला आपण पुन्हा लहान व्हावं आणि अगदी आरामात आयुष्य जगावं, असंही वाटतं; मात्र ते शक्य नसतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपलं बालपण पुन्हा एकदा आपल्या मुलांमध्ये अनुभवतात. असंच काहीसं विनोदी अभिनेता कुशल बद्रिकेदेखील अनुभवत आहे.
कुशलने नुकताच त्याच्या इन्स्टग्राम अकाउंटवर मुलांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक मुलगा मस्त चित्र काढत आहे आणि दुसरा मुलगा खिडकीत बसून गिटार वाजवत आहे. या दोघांच्या फोटोवर त्याने कॅप्शनमध्ये “लहान मूल होता आलं पाहिजे”, असं म्हटलं आहे. तसेच मुलांचे विनोदी शब्दांत कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. कुशलची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
त्याने पोस्टमध्ये त्याच्या मुलांमुळे घरी मेस्सी, रोनाल्डो व स्पायडरमॅन त्याच्या घरी पडीक असतात, असे म्हटले आहे. “ही माझी मुलं…. यांना कधीही… काहीही… होता येतं. आज एक जण ‘रॉकस्टार’ झालाय; तर एकजण ‘पेंटर’ झाला आहे. तसे हे दोघं रोज कोण ना कोण होत असतात. त्यांच्यामुळे ते मेस्सी, रोनाल्डो, स्पायडरमॅन, पुष्पा… पुष्पराज वगैरे मंडळी तर माझ्या घरी पडीक असतात”, असं कुशलने पोस्टमध्ये लिहिले आहे.
पुढे मुलांची अतर्काची दुनिया असा उल्लेख करत कुशलने लिहिले, “तुम्हाला सांगू… आपल्या सगळ्यांच्या जगापल्याड या मुलांची एक दुनिया आहे. ‘अतर्काची दुनिया’, ज्यात काळ-वेळेचं गणित नाही की अनावश्यक लॉजिक नाहीत. जिथे ‘सॉरी’ म्हटलं की, विषय संपतो. ‘कट्टी’पासून सुरू झालेली लढाई, ‘बट्टी’ म्हटलं की संपते आणि मैत्री आधीपेक्षा घट्ट होते. आईरक्ताची शपथ ही लक्ष्मणरेषेपेक्षा डेंजर असते, ती कधीच ओलांडता येत नाही.”
आपल्या दोन्ही मुलांचे बालपण आणि त्यांचा आनंद पाहून कुशललाही आनंद होत आहे. त्याने पोस्टमध्ये पुढे लिहिले, “मला एवढंच वाटतं की, आज लहानपणी त्यांना वाट्टेल ते होता येतंय, मोठे झाल्यावर ते कोण होतील माहीत नाही; पण त्यांना ‘लहान मूल’ होता आलं पाहिजे. बास…! सुकून.” कुशल बद्रिकेने मुलांसाठी लिहिलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.