‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना अनेक वर्षे खळखळून हसवले. त्यातील कुशल बद्रिके, भाऊ कदम, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, नीलेश साबळे हे कलाकार आणि त्यांच्या विनोदाने सर्वांना भुरळ घातली होती. श्रेया बुगडेने या कार्यक्रमात साकारलेल्या अनेक भूमिका आजही तिच्या चाहत्यांना पाहाव्याशा वाटतात. अशात आज श्रेयाचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेने तिच्यासाठी एक विनोदी पोस्ट शेअर केली आहे.

कुशल बद्रिकेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये दोघेही ‘कोस्टा कॅफे’समोर उभे आहेत. त्यावर कुशल श्रेयाला म्हणतो की, आपल्या आई-बाबांनी आपल्याला किती कष्टानं वाढवलं आहे ना… त्यावर श्रेया म्हणते हो खरं आहे. पण, त्यांच्या आई- बाबांनी यांना कोस्टानं वाढवलं आहे आणि दोघेही ‘कोस्टा कॅफे’कडे पाहतात. हा मजेशीर विनोदी व्हिडीओ पोस्ट करीत कुशलने त्यावर कॅप्शनमध्ये श्रेयाबरोबर त्याची मैत्री कशी आहे हे व्यक्त केलं आहे.

“श्रेया यार तुला भेटल्यावर माझी खात्री पटली की, लग्नाच्या गाठी जशा “स्वर्गात” बांधल्या जातात. तशाच मैत्रीच्या गाठी ह्या “नरकात” बांधल्या जातात. आपण सोबत असलो तर नरकातल्या शिक्षासुद्धा आनंदाने भोगू. अमुक एक शिक्षा अनुभवायची असेल तर काय किडे करावे लागतात हे विचारून तेसुद्धा पूर्ण करू पण एकट्याने स्वर्ग गाठायची वेळ आलीच तर… नकोसा होईल तो, स्वर्गसुद्धा नरक वाटेल!”, असं कुशलने कॅप्नमध्ये लिहिलं आहे.

तसेच पुढे त्याने लिहिले, “म्हणून सांगतो ‘माझ्यासारखं’ थोडं थोडं पुण्य करत जा अधूनमधून, बाकी मी स्वर्गात वशिला लावतो तुझा. टेन्शन नाय!! आणि हो वाढदिवसाच्या शुभेच्छा.” श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके या दोघांची मैत्री किती खास आहे हे त्याने शेअर केलेली पोस्ट पाहून समजत आहे.

कुशलने शेअर केलेल्या या पोस्टवर श्रेयानेही मजेशीर कमेंट केली आहे. तिने यावर कुशलला थेट प्रश्न विचारला आहे. “माझ्या वाढदिवसाला तू हे पोस्ट करणार आहेस हे तू मला का सांगितलं नाहीस?, मला कॉल कर…”, असं श्रेयाने यावर कमेंट करीत लिहिले आहे.

श्रेया आणि कुशल दोघेही नुकतेच ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘मकर संक्रांत विशेष उत्सव गोड नात्यांचा’ मध्ये झळकले होते. येथेही दोघांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवले.

कुशल बद्रिकेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ‘चला हवा येऊ द्या’नंतर तो ‘मॅडनेस मचायेंगे’ या कार्यक्रमात दिसला होता. या कार्यक्रमातही त्याने आपल्या विनोदाने सर्वांना पोट दुखेपर्यंत हसवले. तर श्रेया ‘ड्रामा ज्युनियर्स’ या कार्यक्रमात होस्ट म्हणून झळकली. श्रेयाचा आज वाढदिवस असल्याने सोशल मीडियावर अनेक कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader