‘चला हवा येऊ द्या’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा शो अगदी आवडीने पाहिला जातो. अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये हजेरी लावतात. नुकतंच गौर गोपाल दास यांनी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये हजेरी लावली होती. या शोमधील त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गौर गोपाल दास यांचा एक व्हिडीओ अभिनेता कुशल बद्रिकेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गौर गोपाल दास प्रेमाबाबत बोलत आहेत.
काय म्हणाले गौर गोपाल दास?
कधी कधी मैत्री आणि नात्यांमध्ये आपण लोकांच्या इतक्या आहारी जातो, की आपलं अस्तित्वच विसरुन जातो. मग ते आपल्याला रिमोट कंट्रोल करतात. ते म्हणाले आपण चांगले दिसतोय, तर आपल्याला आनंद होतो. त्यांनी जर अपमान केला, तर आपल्याला फार वाईट वाटतं. मग आपण आपल्या भावनांचा रिमोट त्यांच्या हातात देतो.
कोणाच्या आहारी जाणं म्हणजे स्वत:ला विसरुन जाणं. स्वत:ची बुद्धी सोडून देणं. आपल्या सुखाचा किंवा दु:खाचा रिमोट त्यांच्या हातात देणं. मला सुखी करायचं काम तुमचं आहे. मला दुखी करायचं काम तुमचं नाही, पण तुम्ही करतच आहात. रिमोट कंट्रोल एसी आणि टीव्हीसाठी चांगला असतो. पण, आयुष्यासाठी फार वाईट असतो. कारण, लोक नेहमी आपल्या भावनांशी फार खेळ खेळत असतात. म्हणून आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल स्वत:च्या हातात घेणं फार गरजेचं आहे.
जेव्हा प्रेम होतं, तेव्हा माणूस मागे पुढे काहीच पाहत नाही. प्रेमात कोणीही लॉजिक वापरत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, प्रेम आंधळं असतं आणि लग्न तुमचे डोळे उघडतं. एकदा डोळे उघडल्यावर आपण काय केलंय ते कळतं. अचानक वस्तूस्थिती समोर येते.
गौर गोपाल दास यांचा हा व्हिडीओ कुशल ब्रदिकेने शेअर केला आहे. “आपण माणसांवर प्रेम करतो. आपल्याला माणसांची सवय होते. पण, समोरची व्यक्ती त्या लायक नसेल तर? माझ्या आयुष्यातल्या ९०% लोकांचा हा प्रॉब्लम आहे आणि मी सुद्धा त्या ९०% लोकांमध्ये येतो,” असं कॅप्शन कुशल बद्रिकेने या पोस्टला दिलं आहे. कुशल बद्रिकेची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.