आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा विनोदाचा बादशाह म्हणजेच कुशल बद्रिके. मराठी चित्रपट, मालिका, कॉमेडी शो यांद्वारे कुशल घराघरांत लोकप्रिय झाला. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून कुशलनं १० वर्षं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता कुशल सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यानिमित्ताने मराठी ते हिंदी इंडस्ट्रीमधला प्रवास सांगणारी पोस्ट कुशलने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
कुशलने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘मॅडनेस मचायेंगे’च्या सेटवरील काही खास फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीसह या शोमधील अन्य कलाकारांसह शूटदरम्यान काढलेले फोटो त्याने शेअर केले आहेत. या आठवणी जपणाऱ्या फोटोंना त्यानं खूप सुंदर कॅप्शन दिली आणि लिहिलं, “हिंदी म्हणजे आयुष्यात आलेली सगळ्यात मोठ्ठी संधी”, असं काही मला वाटत नाही. पण माझा ‘अमोल पणशीकर’ नावाचा मित्र मला कायम म्हणतो, “स्वतःचं कॅनव्हास मोठं कर म्हणजे चित्र काढायला मजा येईल आणि ते रंगवायलाही!” म्हटलं एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. मला खरंच मजा आली. खूप वेगळा आणि खूप चांगला अनुभव आला. नवीन मित्र मिळाले, नवीन शिकायला मिळालं.”
कुशलने पुढे लिहिलं, “आज आणि उद्या या हिंदी कार्यक्रमाचे शेवटचे भाग टेलिकास्ट होत आहेत. नक्की बघा ‘मॅडनेस मचायेंगे’ सोनी हिंदीवर. एक गोष्ट अनुभवली, आयुष्याला रंगत येण्यासाठी अख्खं आभाळ रंगवायची गरज नाही. माणसाला स्वतःपुरतं इंद्रधनुष्य होता आलं, की पुरेसं होतं.” कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कपिल शर्माचा प्रसिद्ध कॉमेडी शो सध्या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत असल्याने त्या जागी ‘मॅडनेस मचायेंगे’ कार्यक्रमाचं प्रसारण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या शोचे शेवटचे दोन भाग शिल्लक असून, रविवारी हा शो चाहत्यांचा निरोप घेणार आहे. कमी टीआरपीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.
दरम्यान, ‘मॅडनेस मचायेंगे’ या कॉमेडी शोची सुरुवात ९ मार्च २०२४ रोजी झाली होती. आता या शोचा शेवटचा भाग रविवारी ७ जुलै रोजी प्रसारित होणार आहे. या शोमध्ये कुशल बद्रिकेसह हेमांगी कवी व गौरव मोरे हे मराठमोळे कलाकारदेखील झळकले आहेत.