अभिनेता कुशल बद्रिके ‘चल हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. आज सोशल मीडियावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अर्थात मनोरंजन क्षेत्रातील त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. पण या सगळ्यात त्याला त्याची पत्नी सुनयनाची खंबीर साथ मिळाली आहे. नुकतीच कुशलने सुनयनासाठी इन्स्टाग्रावर खास पोस्ट शेअर केली. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये कुशलने लिहिलं, “यार सुनयना, लग्नानंतर तू नोकरी करायचा निर्णय घेतलास आणि मी अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करायला मोकळा झालो. माझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या तू एक हाती सांभाळल्यास. घराचे हप्ते, संसाराचा राडा, गंधारचं बालपण सगळं सगळं तू बघितलस. मी कुठेच नव्हतो ह्या सगळ्यात आणि त्यानंतर कधीतरी तू स्वतःसाठी एक स्वप्न पाहिलंस कथ्थक शिकायचं, आणि परफॉर्म करायचं. आज तुला ‘मुघल-ए-आझम’च्या शो मध्ये परफॉर्म करताना पाहिलं आणि काय भारी वाटलं यार मला.”

आणखी वाचा- Video : ट्रॅफिक अन् बायकोचा गाडीमध्येच डान्स, कुशल बद्रिके व्हिडीओ शेअर करत म्हणतो, “असं कोण वागतं यार…”

कुशलने पुढे लिहिलं, “ते रात्री अपरात्री तू क्रांधा तिकधा तुन्ना… तिकीड तिकीड धुम…. वगैरे बडबड करायचीच बघ सारखं ते बोटांवर काहीतरी एक दोन, एक दोन तीन… एक दोन तीन चार… असं काहीतरी बडबड करत राहायचीस रात्ररात्रभर ते आठवलं. (सॉरी मला नेमक असं त्यातलं काही येत नाही पण..) किती मस्त नाचतेस गं तू आणि किती मोठ्या जागी परफॉर्म करतेस यार. खरंच तुझा अभिमान वाटतो मला. ‘तुझ्या नावापुढे, माझं एक नाव, जन्म मृत्यू पल्याड, प्रेम नावाचं गाव’ आणि हो, ‘मुघल-ए-आझम’ एक जिवंत सिनेमा, एक दैदिप्यमान अनुभव. प्रियांका बर्वे तुझ्या विषयी सविस्तर लिहीनच पण तू कमाल आहेस अनारकली म्हणून तू सलीमचच काय आम्हा सगळ्या प्रेक्षकांची सुद्धा मनं जिंकलीस. तुला खूप प्रेम.”

दरम्यान कुशलची पत्नी सुनयना ही उत्तम कथ्थक डान्सर आहे. अनेकदा तो पत्नीचे फोटो आणि व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतो. याशिवाय त्याच्या इतर इन्स्टाग्राम पोस्ट आणि व्हिडीओही सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतात. कुशलने त्याच्या दमदार विनोदी स्टाइलने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Story img Loader