Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar Wedding: ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड नुकताच लग्नबंधनात अडकला. १४ डिसेंबरला किरणने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. मालवणात मोठ्या थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला आणि अखेर किरण गायकवाड सावंतवाडीचा जावई झाला. त्यामुळे सध्या किरण आणि वैष्णवीच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तसंच दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.
मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी आणि रिसेप्शन असा समारंभपूर्वक लग्नसोहळा किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरचा पाहायला मिळाला. लग्नासाठी किरण आणि वैष्णवीने मराठी पारंपारिक लूक केला होता. अभिनेत्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि त्यावर फेटा बांधला होता. तर वैष्णवी कल्याणकरने गडद जांभळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. ज्यावर तिने मोजके दागिने परिधान केले होते. त्यामुळे दोघं फारच सुंदर दिसत होते.
किरण आणि वैष्णवीच्या लग्नाला ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील कलाकार पाहायला मिळाले. अभिनेता अमरनाथ खराडे, निखिल चव्हाण, सुमीत पुसावळे, महेश जाधव, राहूल मगदुम आणि पूर्वा शिंदे यांनी खास हजेरी लावली होती. लग्नात ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील कलाकार धमाल करताना दिसले. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसंच ‘लागिरं झालं जी’च्या बॉइज टीमने किरण आणि वैष्णवीला लग्नाच्या हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेता निखिल चव्हाणने किरण आणि वैष्णवीला लग्नाच्या शुभेच्छा देत एक हटके पोस्टर शेअर केलं आहे. ज्यावर लिहिलं आहे, “झी मराठी प्रसन्न…आमच्या येथे झी मराठी कृपेने देवमाणसाच्या आशीर्वादाने किरण आणि वैष्णवी यांना प्रेमाचे लागिर झालं जी…ना शितली…ना जयडी…वैष्णवी होणार भैय्यासाहेबाची बायडी…शुभेच्छूक लागिर बॉइज, चांदवडी.”
हेही वाचा – ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिषेक गावकरने लग्नानंतर बायकोचं नाव का बदललं? वाचा किस्सा
दरम्यान, किरण गायकवाडने २९ नोव्हेंबरला प्रेमाची कुबली दिली. वैष्णवीबरोबर फोटो शेअर करत अभिनेता म्हणाला, “तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस; पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायचं ठरवलं आहे…मंत्रिमंडळल्या बैठका होतं राहतील, मंत्री पद वाटत राहतील, त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो…ही आहे माझी होणारी ‘होम मिनिस्टर’,” अशी सुंदर पोस्ट लिहून किरणने चाहत्यांना सुखद धक्काच दिला होता. तेव्हापासून किरण आणि वैष्णवीच्या लग्नाची चर्चा रंगली होती.
© IE Online Media Services (P) Ltd