‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लागीरं झालं जी’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं घर निर्माण केलं आहे. मालिका बंद होऊन साडे चार वर्षांहून अधिक काळ झाला असला तरी अजूनही या मालिकेची चर्चा होतं असते. ‘लागीरं झालं जी’मधील कलाकार सध्या नवनवीन चित्रपट, मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. लवकरच या मालिकेत शितलीची भूमिका साकारलेली अभिनेत्री शिवानी बावकर ‘स्टार प्रवाह’च्या ‘साधी माणसं’ मालिकेत पाहायला मिळणार आहे. अशातच ‘लागीरं झालं जी’मधल्या एका अभिनेत्याने उद्योग क्षेत्रात पदार्पण केल्याचं समोर आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. अभिनय क्षेत्रातलं काम सांभाळत स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत. मेघा धाडे, श्रेया बुगडे, अनघा अतुल, अरबाज शेख, तेजस्विनी पंडित अशा अनेक कलाकारांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. आता या यादीत आणखी एका अभिनेत्याचं नाव सामील झालं आहे. ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील ‘टॅलेंट’ म्हणजेच महेश जाधव याने उद्योग क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
अभिनेता महेश जाधवने फलटणमध्ये स्वतःचा फूड ट्रक सुरू केला आहे. ‘हॅलो शॉरमा’, असं फूड ट्रकचं नाव आहे. काल, ११ जानेवारीपासून हा फूड ट्रक महेशने मित्राच्या साथीने सुरू केला आहे. यासंदर्भात अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. इतर कलाकार मंडळी महेशला नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.
हेही वाचा – “खानदेशी झाली बो…”, ‘ताली’ फेम वहिनीने खानदेशी जेवण बनवल्यावर अमृता देशमुखची पोस्ट, म्हणाली…
दरम्यान, महेश जाधवच्या कामाबद्दल बोलायचं झालं, ‘लागीरं झालं जी’नंतर तो अनेक मालिकांमध्ये पाहायला मिळाला. तसेच त्याने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामध्ये काम केलं. याशिवाय तो ‘फकाट’ या चित्रपटातही झळकला.