‘लग्नानंतर होईलच प्रेम'(Lagnanantar Hoilach Prem) ही मालिका सध्या सातत्याने चर्चेत असल्याचे दिसते. मालिकेत येणारे ट्विस्ट, वाद-विवाद, भांडणे, नाती जपण्यासाठी होत असलेले प्रयत्न या सगळ्यांमुळे ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. पार्थ आणि नंदिनीचे लग्न ठरले होते; मात्र नंदिनीला तिच्या लग्नात किडनॅप केले गेले. गावकऱ्यांच्या दबावामुळे नंदिनीची लहान बहीण काव्या व पार्थचे लग्न लावून देण्यात आले. मात्र, काव्याचे प्रेम हे पार्थचा लहान भाऊ जीवावर होते. जेव्हा जीवा नंदिनीला घेऊन परत आला तेव्हा त्या दोघांनाही मोठा धक्का बसला. त्यानंतर त्याच मांडवात नंदिनी व जीवाचेदेखील लग्न झाले. काव्या व जीवाला अजूनही ही लग्ने मान्य नाहीत. पण, नंदिनी व पार्थ यांनी त्यांचे हे लग्न मान्य केले आहे.

मालिकेत पार्थ व नंदिनी हे समजूतदार असल्याचे दिसते; तर काव्या स्पष्टवक्ती आणि राग सहन न होणारी असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे मालिकेत अनेक गमतीजमती पाहायला मिळतात. या मालिकेत नंदिनीची भूमिका अभिनेत्री मृणाल दुसानिसने साकारली आहे आणि पार्थची भूमिका अभिनेता विजय आंदळकरने साकारली आहे. काव्याच्या भूमिकेत ज्ञानदा रामतीर्थकर आणि जीवाच्या भूमिकेत अभिनेता विवेक सांगळे दिसत आहे.

“त्याला कधी सांभाळून घ्यावं…”

आता विवेक सांगळे आणि मृणाल दुसानिस यांनी नुकताच ‘राजश्री मराठी’बरोबर संवाद साधला. यावेळी मृणाल दुसानिसला विचारण्यात आले की, ऑफ कॅमेरा विवेकला किती सांभाळून घेतेस? या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेत्रीने मृणाल दुसानिस म्हणाली, “ऑफ कॅमेरा त्याला कधी सांभाळून घ्यावं लागलं नाही. कारण- तो तसा जबाबदार आहे. तो त्याच्या त्याच्या कामात असतो. त्याच्यामुळे कधी समस्या निर्माण झाली आहे, असं कधीच झालं नाही. तो त्याचं काम करतो आणि तेच एक सहकलाकार म्हणून हवं असतं. आम्ही सीनचा सरावही करतो.”

विवेक सांगळे मृणाल दुसानिसचे कौतुक करीत म्हणाला, “तिच्या आवाजातच एक मृदूपणा आहे. एखाद्या पात्राचा आवाज ऐकताना आल्हाददायक वाटतं. तसा तिचा आवाज आहे. त्यामुळे ते स्क्रीनवरदेखील छान दिसतं.”

दरम्यान, जीवा नंदिनीबरोबरचे लग्न आणि काव्या पार्थबरोबरचे लग्न कधी स्वीकारणार, जीवा व काव्याच्या नात्याबद्दल घरी कोणाला समजणार का? रम्या व तिची आई काय करणार, मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असलेले दिसतात. तसेच या नवीन जोड्यांना प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसते.