अभिनेत्री मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विजय आंदळकर, विवेक सांगळे यांची मुख्य भूमिका असलेली मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. त्यामुळे मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नुकतंच ‘ठरलं तर मग’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील अर्जुन-तन्वी आणि पार्थ-नंदिनीचा महासंगीत सोहळा पार पडला.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत सध्या पार्थ-नंदिनीचा लग्नसोहळा सुरू आहे. या लग्न सोहळ्याला ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळींनी खास उपस्थिती लावली होती. ते राजकीय व्यक्तिरेखेत झळकले. यामुळे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील एका अभिनेत्रीला २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मिलिंद गवळींबरोबर काम करण्याची संधी मिळाली. याबाबत तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील नंदिनीची बकुळा मामी म्हणजेच अभिनेत्री साक्षी परांजपेला २५ वर्षांनंतर मिलिंद गवळींबरोबर काम करण्याचा योग आला. याआधी तिने मिलिंद गवळींबरोबर २००० मध्ये एका चित्रपटात काम केलं होतं. ‘हे खेळ नशिबाचे’ असं त्या चित्रपटाचं नाव होतं. त्या चित्रपटातील मिलिंद गवळींबरोबरचा फोटो आणि आताचा फोटो शेअर करत साक्षीने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे.

साक्षीने लिहिलं, “खरंतर शब्द नाहीत लिहायला. २५ वर्षापूर्वी मिलिंद गवळी सरांबरोबर काम केलं होतं ते पण ठरवून नव्हे आणि आज काम म्हणून जे क्षेत्र निवडलं. त्यात पुन्हा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मिलिंद सर, तुम्ही खरंच व्यक्ती, कलाकार म्हणून खूप छान आहात. मी खरंच खूप भाग्यवान आहे.”

दरम्यान, साक्षी परांजपेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेआधी ‘आदिशक्ती’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत काम केलं होतं. ‘आदिशक्ती’ मालिकेत साक्षी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकली होती. तर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत मंगला कुलकर्णीच्या भूमिकेत पाहायला मिळाली. याशिवाय साक्षी ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत झळकली होती.

Story img Loader