Lagnanantar Hoilach Prem Actress : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय. या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानिसने टीव्हीवर पुनरागमन केलं आहे. या मालिकेत ज्ञानदा रामतिर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर, कश्मिरा कुलकर्णी, रुजुता देशमुख, अविनाश नारकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. या मालिकेतील एक अभिनेत्री व्यावसायिक ज्योतिषी आहे, हे तुम्हाला माहितीये का? कोण आहे ती, जाणून घेऊयात.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये रम्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी (Kashmira Kulkarni is Professional Astrologer) ही उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच ज्योतिषी व वास्तुतज्ज्ञ देखील आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेआधी कश्मिरा ‘काव्याअंजली’ या मालिकेत झळकली होती. यात तिने काव्या नावाची मुख्य भूमिका केली होती. तिने मोठ्या ब्रेकनंतर या मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन केलं होतं. तेव्हा ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिने ज्योतिषशास्त्राच्या आवडीबद्दल सांगितलं होतं.
ज्योतिषशास्त्राबद्दल काय म्हणाली कश्मिरा?
काश्मिराने ज्योतिषशास्त्रातील तिची आवड आणि त्याबद्दलचे तिचे प्रेम कसे वाढले याबद्दल सांगितलं होतं. “मी एक व्यावसायिक ज्योतिषी आहे आणि लोकांना त्यांच्या करिअरचा आणि जीवनाचा योग्य मार्ग निवडण्यात मदत करते. ज्योतिषशास्त्र मला आवडतं आणि त्यात मला रस आहे. माझा हेतू लोकांना मदत करणे आणि त्यांना योग्य मार्ग निवडण्यात मदत करणे हा आहे. मी कधी कधी माझ्या शूटिंगमधून वेळ काढून माझ्या क्लायंटला फोनवर मार्गदर्शन करते आणि मग मी शूटिंग करते. मी आता अभिनय व ज्योतिषशास्त्र या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळत आहे,” असं कश्मिराने म्हटलं होतं.
मधली काही वर्षे कश्मिरा टीव्हीपासून दूर होती, तेव्हा ती काय करत होती तेही तिने सांगितलं होतं. “मी अभिनयापासून पूर्णपणे दूर नव्हते. मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करत होते. टीव्हीवर काम करण्यासाठी मी योग्य संधी शोधत होते. मला काव्याअंजली मालिकेची ऑफर आली, मला मालिका आवडली व आता मी टीव्हीवर परत आले,” असं कश्मिराने म्हटलं होतं.
सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत रम्याच्या भूमिकेतील कश्मिरा कुलकर्णीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय. या मालिकेत सध्या विक्रम देशमुख यांनी रम्यासाठी त्यांच्या मित्राच्या मुलाचं स्थळ आणल्याचं पाहायला मिळतंय. पण पार्थवर प्रेम असणारी रम्या आपलं लग्न झालंय आणि दुसऱ्यावर प्रेम आहे, असं पाहुण्यांसमोर सर्वांना सांगते आणि यामुळे पाहुण्यांबरोबरच संपूर्ण देशमुख कुटुंबाला धक्का बसतो.
दरम्यान, कश्मिराच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘काव्यांअंजली,’ ‘ढोलकी’, ‘कॅरी ऑन मराठा’, ‘जर्नी प्रेमाची’, ‘श्री गुरुदेव दत्त’, ‘दृश्य काव्यम’, ‘डब्बा ऐस पैस’ अशा मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे.